
मुंबई, दि.१४ : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या उभारणीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे करावे, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहमदाबाद येथे आयोजित या प्रकल्पाच्या भूमीपूजन कार्यक्रमात केली. या बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या एकत्रित उत्पादनामध्ये (जीडीपी) लक्षणीय वाढ होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
देशाचे प्रधानमंत्री मोदी आणि जपानचे प्रधानमंत्री शिन्जो आबे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदाबाद येथे आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे नमूद करताना देशातील पहिली बुलेट ट्रेन ही महाराष्ट्र आणि गुजरातला प्राप्त होत असल्याबद्दल आभार व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री मोदींनी देशासमोर ठेवलेल्या नवभारताच्या संकल्पनेचा पाया आज बुलेट ट्रेनच्या रुपाने घातला जात आहे. नव्या भारताकडे जाण्याची सुरुवात महाराष्ट्र आणि गुजरातपासून होत असल्याचा विशेष आनंद आहे. या ट्रेनचा फायदा विशेषत: या दोन्ही राज्यांना आणि पर्यायाने देशाला होणार आहे. बुलेट ट्रेनमुळे रोजगार निर्माण होणार असून दोन्ही राज्यांच्या जीडीपीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. भूमीपूजनाचा कार्यक्रम आज अहमदाबाद येथे होत असला तरी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी याच ट्रेनने मुंबई येथे येऊन करावे, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.
बुलेट ट्रेनसह महाराष्ट्रातील मुंबईच्या मेट्रो, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अशा विविध प्रकल्पांसाठी जपानकडून जवळपास 30 हजार कोटींचे कर्ज उपलब्ध झाल्याने मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असल्याचे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी जपानचे प्रधानमंत्री शिन्जो आबे यांचे यावेळी विशेष आभार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
