डॉ. आंबेडकरांनी समता आणि समाजक्रांतीचा पाया दीक्षाभूमीवर रचला - राष्ट्रपती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकरांनी समता आणि समाजक्रांतीचा पाया दीक्षाभूमीवर रचला - राष्ट्रपती

Share This

नागपूर, दि. २२ : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या दौऱ्याच्या प्रारंभी दीक्षाभूमीला भेट दिली. “परमपूज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि समाजक्रांतीचा पाया या पावन भूमीवर रचला. यामुळे भारतीय तथा संपूर्ण मानव समाज प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर होऊ शकला. ही पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण जगाला त्याग, शांती आणि मानवतेकडे जाण्यास प्रेरित करीत आहे. मला या ठिकाणी येऊन खूप आनंद वाटला.” अशा आशयाचा अभिप्राय त्यांनी यावेळी नोंदविला.

यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार,आमदार प्रकाश गजभिये, स्मारक समितीचे अध्यक्ष सदानंद फुलझेले, भंते सुरई ससाई उपस्थित होते.

सकाळी १०.२५ वाजता राष्ट्रपती यांचे दीक्षाभूमीवर आगमन झाले. स्मारक समिती सदस्य विलास गजघाटे व राजेंद्र गवई यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींनी भगवान गौतम बुद्ध यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी बुद्ध वंदनेमध्ये सहभाग घेतला. स्मारक समितीचे अध्यक्ष व सचिवांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. यावेळी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘बुद्धा ॲण्ड हिज धम्म’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. यानंतर राष्ट्रपतींनी दीक्षाभूमीच्या ‘डोम’ ची पाहणी केली. दीक्षाभूमी परिसरात असलेल्या भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. दीक्षाभूमी परिसरातील बोधीवृक्षास राष्ट्रपतींनी भेट देऊन अभिवादन केले.

स्मारक समितीचे अध्यक्ष सदानंद फुलझेले यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करुन राष्ट्रपतींनी फुलझेले यांना राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages