दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह व मंडईचा पुनर्विकास रखडला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह व मंडईचा पुनर्विकास रखडला

Share This
विकासकाचे दुर्लक्ष, पालिकेकडून मात्र 14 कोटी रुपये खर्च -
मुंबई | प्रतिनिधी -
विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह व मंडईच्या इमारतीच्या पुनर्विकास केला जाणार होता. मात्र विकासकाने कोणतेही विकासाचे काम केलेले नसतानाही महापालिकेच्यावतीने मंडईवर खर्च केला जात आहे. असे असताना सुधार समितीने ही मंडई महापालिकेच्या ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंडई आणि नाट्यगृहाची डागडुजी पुढील तीन वर्षे पालिकेच्या खर्चातून केली जाणार असून मंडईसाठी खासगी सुरक्षा यंत्रणाही तैनात केली जाणार आहे. सुधार समितीच्या या निर्णयावरुन पालिका विकासकाला फायदा पोहचवत असल्याची चर्चा सध्या पालिकेत सुरु आहे.

पुनर्विकासाच्या कामासाठी दीनानाथ मंगेशकर म्युनिसिपल मार्केट व्यापारी संघाने मंथन बिल्डर्स आणि डेव्हलपर्सची निवड केली होती. महापालिकेने याला मंजुरीही दिली होती. परंतु 2013 पर्यंत या विकासकाने काहीच काम केले नाही. त्यामुळे मंडई आणि नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर महापालिकेचेच 14 कोटी रुपये खर्च झाले आहेत. दरम्यान, सदर वास्तूसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराने ही वास्तू मजबूत असल्याचं प्रमाणपत्र दिलं. त्यामुळे मंडईचा पुनर्विकास रद्द करुन ती महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. सुधार समितीने मात्र याला मंजुरी न देता मंडईच्या पुनर्विकासाचे अधिकार विकासकाकडेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची संपूर्ण जबाबदारी ही विकासकाकडे असून यासंदर्भातील कोणत्याही कामासाठी महापालिका वारंवार हात वर करत असते. परंतु, आता त्याच महापालिकेने स्वखर्चाने नाट्यगृह आणि मंडईसाठी सुरक्षा यंत्रणेची सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ईगल सिक्युरिटीज नावाच्या खासगी सुरक्षा कंपनीची निवडही करण्यात आलेली आहे. यासाठी 77 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तीन वर्षांकरता ही खासगी सुरक्षा सेवा घेतली जाणार असल्याचे पालिकेच्या संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages