पाळणाघराच्या मागणीला जोर -
मुंबई । प्रतिनिधी -
लारिस्सा वॉटर्स ऑस्ट्रेलियाच्या संसदेत बाळाला स्तनपान देणा-या पहिल्या माता महिला संसद सदस्या ठरल्या. आणि त्यानंतर शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी कौंटुबिक - जिव्हाळ्याच्या आणि लवचिक कामाच्या जागा मिळायला हव्यात, तसेच पाळणाघर देखील असावे अशी मागणी पुढे आली होती. असाच प्रकार सध्या मुंबई महापालिकेतही निदर्शनास आला. आज महापालिका सभागृहात होण्यासाठी भाजपच्या नगरसेविका शितल गंभीर - देसाई या आपलट्या साडे तीन महिन्याची मुलगी सिया हिला घेऊन आल्या होत्या. त्यावेळी इतर अनेक नागरसेविकांकडून लहान बाळांना सांभाळण्यासाठी महापालिका मुख्यालयात पाळणाघराची आवश्यकतेबाबत चर्चा सुरु होती. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात नगरसेविकांना पाळणाघराची कमी जाणवत असताना असाच अनुभव महिला कर्मचाऱ्यांनाही येत आहे. मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अनेक महिला कर्मचारी आपल्या लहान मुलांना पाळणाघरात ठेवून येतात. या महिला कर्मचारी आपल्या लहान बाळापासून दहा ते बारा तास लांब असतात. यामुळे त्यांचे अर्धे लक्ष त्यांच्या बालकांकडे असल्याने त्यांच्या कामावरही परिणाम जाणवू शकतो. यासर्व बाबींचा विचार करता पालिका मुख्यालयात सुसज्य अश्या पाळणाघराची नितांत आवश्यकता असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शितल गंभीर - देसाई यांच्या आधीही काँग्रेसच्या नगरसेविका स्टेफी केणी यांनाही आपल्या लहान बाळासह सभागृहाच्या कामकाजासाठी उपस्थिती लावावी लागली आहे. मुंबई महापालिकेच्या सभागृहात सन २०१४ ते २०३४ या २० वर्षाच्या विकास आराखड्यावर चर्चा सुरु होती. यावेळी आराखड्यावर मतदान घेतले जाणार होते. या मतदान प्रक्रियेत आणि सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेविका स्टेफी केणी आपल्या आठ महिन्याच्या साँचेसला घेऊन आल्या होत्या. केणी या सभागृहाच्या कामकाजात आणि मतदान प्रक्रियेत भाग घेताना त्यांच्या आठ महिन्याच्या बाळाला सांभाळायचा प्रश्न असल्याने केणी यांनी त्यांच्या सासुबाई ज्युडो ग्रेसिस यांना सोबत आणले होते. महापालिका सभागृहाच्या खालील तळमजल्यावर प्रवेशद्वारानजीकच एक खुर्ची घेऊन सासूबाई साँचेसला सोबत घेऊन बसल्या होत्या. अधून मधून नगरसेविका स्टेफी या बाळाला बघायला येत होत्या. मात्र विकास आराखडयावरील चर्चा आणि मतदान प्रक्रिया लांबल्याने मध्यरात्री १ वाजल्यानंतर आराखडा मंजूर करण्यात आला. स्टेफी यांनी मतदान केले आणि त्यांनी विकास आराखड्याची महत्वाची एक जबाबदारी पार पाडली होती. रात्री एक वाजताच्या सुमारास स्टेफी यांनी आपल्या सासूबाईंच्या कुशीत झोपलेल्या बाळाला आपल्या कुशीत घेतले. सभागृहात विकास आराखड्याला मंजुरी दिली जात असताना या लहानग्या साँचेसनेही आपल्या आईपासून १३ तास दूर राहून भविष्यातील मुंबईसाठी योगदान दिले होते.