बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यास सभागृहाची मंजुरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यास सभागृहाची मंजुरी

Share This

मुंबई । प्रतिनिधी 26 Oct 2017 -
आर्थिक डबघाईत असलेल्या बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या प्रस्तावाला आज पालिका सभागृहाने मंजुरी दिली. बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचे आश्वासन पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने आपल्या वचननाम्यात दिले होते. ते वचन आज शिवसेनेने पूर्ण केले असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकारांना सांगितले.

गेले कित्तेक वर्षे बेस्ट आर्थिक संकटात आहे. बेस्टवर पालिकेसह अनेक बँकांचे चार हजार कोटीपर्यंत कर्ज आहे. बेस्ट’ला सध्या दररोज २.५० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. वर्षाला हा तोटा ९०० कोटी रुपयांचा असून २०१० पासून ‘बेस्ट’चा संचित तोटा २५०० कोटींवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने ‘बेस्ट’ला आर्थिक सहाय्य करावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. बेस्टच्या आर्थिक परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासही विलंब होत आहे. वेळेवर पगार भेटत नसल्याने कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी एक दिवसाचा संप केला होता. हा संप मागे घ्यावा म्हणून खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली होती. यावेळी कर्मचाऱ्यांची जबाबदारी पालिका घेईल, कर्मचाऱ्यांना १० तारखेपर्यंत पगार दिला जाईल, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन केला जाईल अशी आश्वासने उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिल्यानंतर लगेच बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी बेस्ट समितीत अर्थसंकल्प विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. सदर प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजुरीसाठी आला असता एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पालिका सभागृहानंतर आता हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. नगरविकास विभागाच्या मंजुरीनंतर बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करून सादर केला जाईल. यामुळे ‘बेस्ट’ची आर्थिक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

परिवहन सेवा मजबूत करण्यासाठी सरकारने प्रस्ताव मंजूर करावा - 
शिवसेनेने वचन दिले होते. ते वाचन पूर्ण केले आहे. पालिका सभागृहात हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी जाईल. मुंबईतील परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी आता राज्य सरकारने हा प्रस्ताव लवकरात लावकार मंजूर करावा. बेस्ट हे महापालिकेचे अंग आहे, बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करण्यात आली असली तरी बेस्टच्या स्वायत्तेवर कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर - मुंबई

बेस्टसाठी ऐतिहासिक दिवस - 
‘बेस्ट’चा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन केल्यामुळे आजचा दिवस बेस्टसाठी ऐतिहासिक असा दिवस आहे. पालिका सभागृहाने विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव पालिका आयुक्त तयार करून राज्य सरकारकडे पाठवतील. बेस्टच्या ३० लाख प्रवासी आणि ४२ हजार प्रवाशांचा प्रश्न असल्याने याचा योग्य विचार करून प्रस्ताव लवकरात लवकर मंजुर करावा.
अनिल कोकीळ - अध्यक्ष बेस्ट समिती

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages