रुग्णालयातील सुविधांच्या चर्चेऐवजी उंदिर ढेकणाचे राजकारण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रुग्णालयातील सुविधांच्या चर्चेऐवजी उंदिर ढेकणाचे राजकारण

Share This
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात एका महिला रुग्णाचा पाय व एकीचा डोळा उंदराने चावल्याच्या घटनेचे पडसाद गुरुवारी पालिका सभागृहात उमटले. काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी रुग्णालयातल्या असुविधांबाबत 66 बी नुसार चर्चा घडवून आणली. या चर्चेदरम्यान प्रशासनाला धारेवर धरण्याची नामी संधी असताना भाजपा आणि शिवसेनेने मात्र एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानली. भाजपाने याप्रकरणाचा निषेध करत सभागृहात बॅनर फडकवत पिंजऱ्यात पकडलेला उंदीर आणून दाखवला. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने राज्य सरकारच्या रुग्णालयांत ढेकूण असल्याचे आरोप केला. 

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतल्या असुविधांबाबत  काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी सभागृहात निवेदन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही असुविधांबाबत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी भाजपही आक्रमक होत कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उंदराने रुग्णांच्या पायाचा व डोळ्याचा घेतलेला चावा या घटनेकडे लक्ष वेधले. प्रशासनाचा हलगर्जीपणाचा कळस असल्याचे सांगून यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, सुस्त यंत्रणेवर काय कारवाई करणार असा सवालही भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांनी विचारला. 

यावेळी भाजपचे नगरसेवक कमलेश यादव यांनी पिंज-यातून आणलेला उंदीर दाखवत या घटनेचा निषेध केला. सभागृहात आणलेल्या उंदरामुऴे प्रचंड गोंधळ झाला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तातडीने उंदराला घेऊन बाहेर जा, सभागृहात असे प्रकार शोभनीय नाही, असे सांगितल्यानंतरही कमलेश यादव उंदराला घेऊन बाहेर गेले नाहीत. याचवेळी भाजपा सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळताच महापौरांनी उंदरासह कमलेश यादव यांना सभागृहाबाहेर घेऊन जाण्यास सांगितले. महापौरांचे आदेश पाळत शिपायांनी यादव यांना उंदरासह सभागृहाबाहेर काढले. 

20 वर्ष सत्तेत असलेल्यांनी या उंदाराला पोसले. इतकी वर्ष पोसलेला हा राजनितीक उंदीर आज मोठा झाला असून ज्याने पोसले त्याच्याच चावत आहे अशी टिका सपाचे रईस शेख यांनी भाजपाचे नाव न घेता केली. भाजपच्या टिकेला सत्ताधारी शिवसेनेनेही जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सभागृह नेते य़शवंत जाधव यांनीही आक्रमक पावित्रा घेत राज्य सरकारच्या रुग्णालयांत ढेकणाचा कसा रुग्णांना त्रास होतो हे सांगत भाजपवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या रुग्णालयांवर टीका करताना आरोग्यमंत्री शिवसेनेचे आहेत, हे मात्र जाधव विसरले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages