मुंबई । प्रतिनिधी -
अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. या आदेशानुसार महापालिकेला अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करणे बंधनकारक आहे. यामुळे 17 नोव्हेंबर 2017 पूर्वी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
मुंबई महानगरपालिका आयुक्त दर महिन्याला आढावा बैठक घेतात. शनिवारी संपन्न झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए.कुंदन, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख इत्यादी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत असे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत महापालिका क्षेत्रातील एकूण 495 अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी 326 धार्मिक स्थळांवर यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे. राहिलेल्या 169 अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश आजच्या बैठकीत दिले. 29 नोव्हेंबर 2009 नंतरच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचे आदेश उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने 5 मे 2011 रोजी दिले होते. यानुसार पालिकेने 495 अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी निश्चित केली होती. अद्याप 169 धार्मिक स्थळांवरील कारवाई अद्याप बाकी असल्याने या अनधिकृत धार्मिक स्थळांवर सर्व सहाय्यक आयुक्तांनी नियोजन पद्धतीने आणि 17 नोव्हेंबरपूर्वी कारवाई पूर्ण करावी, असेही आदेश आयुक्तांनी बैठकी दरम्यान दिले आहेत.