शिक्षण समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले -
मुंबई । प्रतिनिधी - गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईतील शाळांमधूनही विद्यार्थ्यांसोबत अनेकवेळा गैरप्रकार केले जात असल्याचे समोर आले आहे. अश्या परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या शाळा हायटेक केल्याचा दावा केला जात असताना शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे का लावण्यात आले नाही असा प्रश्न उपस्थित करून शिक्षण समिती सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मुंबईतील सर्व खासगी शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सक्ती केली जाते, मग महापालिकेच्या शाळांमध्ये कॅमेरे का लावले जात नाहीत असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये त्वरीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी प्रशासनाला दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ४१७ शाळा चालविण्यात येतात. त्यात २२७ शाळा या भाडेतत्त्वावरील इमारतींत भरवल्या जातात. तसेच मालमत्ता विभागाच्या ३३ शाळा आहेत. तर बिगर भाडेतत्त्वावर २४ अशा एकूण ७०१ शाळांच्या इमारती पालिकेच्या अखत्यारीत येत आहेत. यात जवळपास ३ लाख ४६ हजार ७४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. पालक विश्वासाने मुलांना शाळांमध्ये सोडतात. पण, इथे विद्यार्थी सुरक्षित आहेत की नाही, याविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालक तणावात असतात. हे लक्षात घेऊन महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असे पत्र शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांना दिले आहे.
पालिका शाळांमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने विद्यार्थ्यांचा सुरक्षेसाठी पालिका शाळांमध्ये त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या सदस्या नगरसेविका सईदा खान यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. शाळांमधील सुरक्षा रक्षक आणि केअर टेकर यांच्या वर्तनाबाबतही सईदा खान यांनी शंका उपस्थित करत शाळांमध्ये सुरक्षा रक्षक तसेच स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी यावेळी केली. याला सर्व पक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.
यावर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे आवश्यक असून प्रशासनाने हे कॅमेरे याच आर्थिक वर्षात बसवावे, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी दिले आहेत. हे कॅमेरे प्रत्येक शाळांमध्ये बसवताना ते वर्गनिहाय बसवावेत की प्रवेशद्वारांवर याचाही त्वरीत अहवाल तयार करण्याचेही आदेश दिले. याशिवाय शाळांमध्ये सुरक्षा रक्षक नेमताना, तसेच स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.