मुंबई । प्रतिनिधी 27 Oct 2017 -
मुंबई महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मंगळवार ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्तिथीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते मोफत बस पासचे वाटप करण्यात येणार आहे. सदर मोफत बसपाससाठी महापालिकेकडून अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद करण्यात आली असून सदर खर्च पालिका शिक्षण विभागाकडून भागविण्यात येणार आहे.
शिवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार पक्षाच्या वचननाम्याप्रमाणे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर आणि बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या अथक प्रयत्नाने मुंबई महापालिका शाळातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता मोफत बसपास देण्याचा निर्णय घेण्यात आला . सदर मोफत बसपास योजना हि आगाराच्या परिसरातील पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लागू होणार आहे. पालिका शाळातील गणवेषधारक विद्यार्थ्यांना शाळा दरम्यान बेस्ट बसगाड्यांमधून मोफत बस उपलद्ध होणार आहे. मुंबई महापालिकेच्या ११९५ शाळा असून या शाळांमधून ३ लाख ३४ हजार ९३७ विध्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या २५ बस आगारांमधून एकूण ६९०३ बसपास सध्या तयार झालेले असून टप्याटप्याने सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास तयार करण्यात येत आहेत. महापौर निवासस्थानी यातील ५० विद्यार्थ्यांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोफत बसपासचे वितरण करून सदर योजनेस सुरुवात केली जाणार आहे.