मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेतील कर्मचारी, अधिका-यांना दिवाळी निमित्त 40 हजार रुपये बोनस - सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी मिळावे अशी मागणी संघटनांच्या समन्वय समितीने केली आहे. तशाप्रकारचे पत्रही पालिका आयुक्त, महापौर यांना पाठवल्याचे समितीने पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबई महापालिकेत सुमारे एक लाख 10 हजार कर्मचारी तसेच 30 हजार कंत्राटी कामगार आहेत. मागील वर्षी कर्मचा-यांना 14 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा 20 टक्के म्हणजे सुमारे 40 हजार बोनस/ सानुग्रह अनुदान मिळावे तसेच कंत्राटी कामगारांनाही मागणीनुसार बोनस मिळावा अशी मागणी समितीने केली आहे. विविध मागण्यांसाठी येत्या गुरुवारी, 5 ऑक्टोबरला होणा-य़ा लक्षवेधी मोर्चात बोनसची मागणीही लावून धरली जाणार असल्याचे समितीचे प्रकाश देवदास यांनी सांगितले. दरम्यान यंदा कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान किती मिळणार याबाबत अद्याप प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. मात्र संघटनांनी यंदा 20 टक्के दिवाळी बोनस किंवा मागील वर्षीपेक्षा जास्त मिळावा या मागणीवर ठाम राहण्याची भूमिका घेतल्याचे समजते.