मुंबईतील हायड्रंट पुनरुज्जिवीत करण्यासाठी पुनप्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील हायड्रंट पुनरुज्जिवीत करण्यासाठी पुनप्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणार

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत हायड्रंट बंद असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी येतात. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बंद असलेले फायर हायड्रंट पुनरुज्जिवीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईतील कुलाबा मलजल प्रकल्पाअंतर्गत पुनप्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्थायी समितीत दिली.

मुंबईत तेलशुद्धीकरण कारखाने, रासायनिक खत कारखाने व इतर औद्योगिक उद्योगांमुळे वेळोवेळी रासायनिक अपघातांना अग्निशमन दलाला तोंड द्यावे लागते. रासायनिक प्रकारचे अपघात झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका 'हॅजमॅट' वाहन खरेदी करणार आहे. मंगळवारी स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. अग्निशमन दलात नव्या यंत्रणा हव्यात. पण त्याचा वापर, नवी यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण, प्रत्याक्षिक अग्निशमन दलातील जवानांना दाखविण्यात आली आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रस्तावावर आक्षेप घेतला. दक्षिण मुंबईत पालिका मुख्यालय, रिझर्वबॅंक, स्टॉक एक्सेंज आदी कार्यालये आहेत. गेल्या 2 ते 3 वर्षापासून येथे अग्निशमन दलाची गाडी बंद अवस्थेत आहे. वारंवार पाठपुरावा करुनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अग्निशमन दलाने प्रथम याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना नगरसेवकांनी प्रशासनाला केली. मुलुंडला कारला आग लागल्यानंतर एका तासाने अग्निशमन दलाची गाडी आली. असे प्रकार सुरु राहील्यास मोठे नुकसान होत राहील. त्यामुळे मुंबईत औद्योगिक व कारखाने किती आहेत, आगीच्या वेळी हॅजमॅट सगळीकडे वेळेत नक्की पोहचणार आहे का, आदी प्रश्नांचा भडिमार करत नगरसेवक मंगेश सातमकर, सुजाता सावंत, प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तर इतर देशांच्या तुलनेत मुंबई महापालिका ५ वर्षे मागे असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला. तर जोगेश्वरी परिसरात एकाच महिन्यात ३ वेळा आग लागली होती. येथील हायड्रंट बंद असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंधेरीतून पाणी आणावे लागले. त्यामुळे मुंबईतील हायड्रंट पुनरुज्जिवीत करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी केली.

दरम्यान, हॅजमॅट ही केमिकल न्युक्लीअरसाठी खास गाडी आहे. प्रायोगित तत्वावर गाडी घेण्यात येणार आहे. 6 महिन्यात अग्निशमन दलाच्या ताफ्यात गाडी दाखल होईल. याच दरम्यान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. अग्निशमन दलाचे अधिकारी केमिस्ट्री झालेले असतात. त्यांना गाडी हाताळणे सोपे जाईल. तसेच दक्षिण मुंबईतील हायड्रंटचा वापर करण्यासाठी कुलाबा मलजल प्रकल्पाअंतर्गत पाण्यावर पुनप्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी लागणाऱ्या आगींवर तात्काळ नियंत्रण मिळवणे शक्य होईल, अशी माहिती मुखर्जी यांनी समितीत दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages