एल्फिन्स्टन’च्या पीडित कुटुंबातील एकाला नोकरी द्या ! - राधाकृष्ण विखे पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2017

एल्फिन्स्टन’च्या पीडित कुटुंबातील एकाला नोकरी द्या ! - राधाकृष्ण विखे पाटील


मुंबई । प्रतिनिधी -
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील पीडित कुटुंबांचे सर्वेक्षण करून ज्या कुटुंबातील आर्थिक आधार हरपला असेल, त्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. तसे पत्र विखे पाटील यांनी पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांची भेट घेऊन दिले.

विखे पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे. आपल्या निवेदनात विरोधी पक्षनेत्यांनी नमूद केले आहे की, या घटनेतील पीडितांना महाराष्ट्र सरकार व रेल्वे विभागाने आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु, या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेले अनेक प्रवासी त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. केवळ एकरकमी आर्थिक मदत देऊन ही कुटुंबे पुन्हा उभी राहू शकत नाही. त्यामुळे या घटनेमध्ये मृत्यमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या सर्वच प्रवाशांच्या कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून, ज्या कुटुंबांचा आर्थिक आधार संपुष्टात आला आहे किंवा प्रभावीत झाला आहे, त्या कुटुंबातील अन्य व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रेल्वे विभागात कायमस्वरूपी नोकरी देण्याची आवश्यकता असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad