व्यावसायिक इमारती, हाँटेलच्या टेरेसवरील उपहारगृहांना पालिकेची मंजूरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

व्यावसायिक इमारती, हाँटेलच्या टेरेसवरील उपहारगृहांना पालिकेची मंजूरी

Share This

मुंबई 1 Nov 2017 -- 
शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी इमारतीच्या टेरेसवर उपहारगृहे चालवली जावीत अशी संकल्पना मांडली होती. आदित्य ठाकरे इमारतीच्या टेरेसवर उपहारगृहे चालवण्याच्या संकल्पनेला भाजपाचा विरोध आहे. अश्या परिस्थितीत महापालिका आयुक्तांनी टेरेसवरील उपहारगृहांना मंजूरी देण्यासाठी सुधारित ‘रुफ टॉप पॉलिसी’ प्रसिद्ध केली आहे. या धोरणात फक्त व्यावसायिक इमारती, लॉजिंग बोर्डींगची सोय असलेली हॉटेल्स, मॉलच्या टेरेसवरच उपहारगृह सुरू करता येणार आहे. मात्र टेरेसवर एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करून खाद्यपदार्थ शिजवता येणार नाही, अशा अटी या धोरणात आहेत. हे धोरण गुरूवार (२ नोव्हेंबर) पासून अंमलात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफ आणि टेरेसवरील उपहारगृहांना मान्यता देण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार सन २०१४ मध्ये पालिकेने रुफ टॉपची पॉलिसी आणली होती. मात्र भाजप, मनसेने विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव सुधार समिती व पालिका सभागृहाच्या मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. मुंबईत टेरेसवरील अनेक हॉटेल्स बंद पडली असून हजारो तरूणांचे रोजगार बुडाले असल्याचा दावा सेनेने केला होता. याबाबत प्रशासनाने सुधारित धोरण तयार केले होते. या धोरणाला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय मंजूरी दिली असून त्याची अमलबजावणी करण्याबाबतचे आदेशही दिले आहेत. 

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. समुद्रकिनारी अनेक हाँटेल्स असून त्यांच्या टेरेसवर उपहारगृह सुरू करण्याची मागणी केली जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे पर्यटकांना चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार मिळेल. शिवाय पालिकेचा महसूल वाढण्याबरोबरच पर्यटकही आकर्षित होतील, असे प्रशासनाने या धोरणात म्हटले आहे. यापुर्वी तयार करण्यात आलेल्या धोरणात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे त्यास विरोध झाला होता. गटनेत्यांच्या सूचनांचा समावेश करून हे नवीन धोरण तयार करण्यात आले असून आयुक्तांच्या अधिकारात लागू करण्यात आले असल्याचा दावा पालिकेच्या अधिका-यांनी केला आहे. दरम्यान, पालिकेत कोणतेही धोरण सभागृहाच्या मंजुरीशिवाय अंमलात आणता येत नसताना सेनेने राजकीय दबावाचा वापर केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

शिवसेना - भाजपमध्ये वाद पेटणार -
टेरेसवरील उपहारगृहांना भाजपने पालिकेत विरोध केल्यामुळे हे धोरण मंजुर होऊ शकले नव्हते. दोन वर्षांपूर्वी सुधार समितीत भाजपने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात संतापाचे वातावरण होते. त्यानंतर शिवसेनेने हे धोरण थेट सभागृहाच्या मंजुरीसाठी मांडून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाला हाती धरून सेनेने हे धोरण आयुक्तांकडून मंजुर करून घेतले आहे. दरम्यान याबाबत भाजप - शिवसेनेमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे.

सुधारित नियमावली -
व्यावसायिक इमारती, लॉजिंग बोर्डींगची व्यवस्था असलेली हॉटेल्स, मॉलच्या टेरेसवर उपहारगृह सुरू करता येणार आहे.
टेरेसवर एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करून खाद्यपदार्थ शिजवता येणार नाही
मायक्रोवेव्ह, इंडक्शन कुकींगलाच परवानगी
छत्री, पत्रे अशा कोणत्याही पद्धतीने टेरेस झाकता येणार नाही.
मान्सून शेड लावता येणार नाही.
शेजारच्या इमारतींना आवाजाचा त्रास होता कामा नये.
पोलिसांच्या नियमानुसार आणि पालिकेच्या दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार ठरवून दिलेल्या वेळेपर्यंतच ही हॉटेल्स चालवता येणार.
आग प्रतिबंधक यंत्रणा बसवून अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक
नियमांचा भंग केल्यास कोणत्याही नोटीसीशिवाय परवानगी रद्द केली जाणार

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages