मनसेच्या संजय तुर्डे यांचा अपेक्षाभंग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मनसेच्या संजय तुर्डे यांचा अपेक्षाभंग

Share This

मुंबई | प्रतिनिधी 23 Nov 2017 -
मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर उरलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांची गटनेतेपदी निवड केल्याचे पत्र पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौरांना दिले होते. त्याची घोषणा सभागृहात महापौर करतील अशी अपेक्षा मनसेचे नगरसेवक तुर्डे यांना होती. मात्र त्यांना महापौरांनी शेवटपर्यंत बोलू दिले नाही. महापौरांनी सभागृहात स्थायी समितीमधील रिक्त पदांवर नव्या सदस्यांची घोषणा केल्याने आपल्या गटनेते पदाचीही घोषणा महापौर करतील अशी अपेक्षा तुर्डे यांची होती. मात्र महापौरांनी सभागृह संपेपर्यंत तुर्डे यांना बोलण्याची संधीच दिली नसल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला.

मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे गुरुवारी सभागृहात हजर होते. महापौर जोपर्यंत गटनेत्याची सभागृहात घोषणा करत नाहीत तोपर्यंत प्रथेनुसार गटनेत्याला आपले अधिकार वापरता येत नाहीत. ही घोषणा महापौर करतील अशी अपेक्षा तुर्डे यांना होती. दरम्यान सभागृहात स्थायी समितीत रिक्त झालेल्या जागांवर नव्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र मनसेच्या गटनेता निवडीची घोषणा करण्यात आली नसल्याने तुर्डे यांनी महापौरांकडे आपल्याला बोलायचे आहे म्हणून महापौरांकडे आग्रह धरला. सभागृहात मागे बसलेले तुर्डे माईक घेऊन पुढे आले. मला बोलू द्या म्हणून तुर्डे महापौरांकडे विनंती करत होते, मात्र महापौरांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. महापौरांनी नियमित कामकाज पुकारले आणि त्यांना बोलूच दिले नाही.

आपल्यावर महापौर अन्याय करत असल्याने तुर्डे यांनी सातत्याने मला बोलायला द्या अशी मागणी महापौरांकडे केली. तुर्डे बोलण्यासाठी सतत उभे राहून महापौरांचे लक्ष वेधत होते. महापौर मात्र "ये तू खाली बस, याच्या हातातला माईक काढून घ्या, याला बाहेर काढा असेच सतत तुर्डे यांना उद्देशून बोलत होते. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेत ते या सभागृहाचे सदस्य आहेत, त्यांना बोलू द्या अशी मागणी केली. त्यावर कामकाज संपल्यानंतर त्यांना बोलायला संधी देतो असे महापौरांनी सांगितले.

मनसेच्या गटनेत्याची घोषणा केली जात नसल्याने तुर्डे यांना भाजपच्या सदस्यांनी तुम्ही बोला असे सुचवले. विरोधी पक्षातील इतर सदस्यांनीही तुर्डे यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. मात्र महापौरांनी सभागृहाचे कामकाज सुरूच ठेवले. संपूर्ण कामकाज पार पडल्यानंतर माजी नगरसेविका वखारुन्निसा अन्सारी यांचा शोकप्रस्ताव महापौरांनी सादर केला आणि सभागृहाचे कामकाज तहकूब केले. तुर्डे शेवटपर्यंत बोलण्यासाठी विनंती करीत राहिले, मात्र महापौरांनी त्यांना बोलूच दिले नाही. यामुळे तुर्डे यांचा अपेक्षाभंग झाला.

सुजाता पाटेकर, सुनीता यादव स्थायी समितीवर -
शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता पाटेकर यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. अपक्ष उमेदवार चंगेज मुलतानी यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे स्थायी समितीवर शिवसेनेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर प्रभाग क्रमांक ४ च्या नगरसेविका पाटेकर यांची निवड झाली आहे. तसेच भाजपच्या माजी महापौर व नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपच्या नगरसेविका सुनीता यादव यांची नियुक्ती करण्यात आली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृहात त्यांच्या नावाची घोषणा केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages