भानू फरसाण दुर्घटनेतील मृत्यूला बेकायदा व्यवसायच जबाबदार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भानू फरसाण दुर्घटनेतील मृत्यूला बेकायदा व्यवसायच जबाबदार

Share This

मुंबई | प्रतिनिधी - साकिनाक्यातील खैरानी रोडवरील भानु फरसाणच्या दुकानाला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या कामगारांच्या मृत्यूला बेकायदा व्यवसायच कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या गाळ्यामध्ये फरसाणाचा व्यवसाय करणारा भानुशाली पालिकेकडून परवाना न घेताच व्यवसाय करत होता. तसेच पालिकेकडे कमी कामगारांची नोंद करून त्याने १५ ते २० कामगारांना या ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे फसरणाच्या व्यवसाय करणाऱ्या सह गाळ्याच्या मालकावरही कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

साकीनाक्यातील खैरानी रोड येथील गरीबनगरमधील हा गाळा मखारिया या व्यक्तीच्या नावावर आहे. या ठिकाणी आधी बूट व्यवसाय, त्यानंतर रेडिमेड गारमेंट व्यवसाय आणि आता फरसाणचा व्यवसाय केला जात होता. यामध्ये संबंधित मालक किंवा व्यवसायिकाने पालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे ‘एल’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी यांनी सांगितले. ही इमारत झोपडपट्टी विभागात असून १९७४ ते १९७५ दरम्यान बांधकाम झालेली असावी अशी तोंडी माहिती दिली जात असल्याचे ते म्हणाले. व्यावसायिक भानुशाली याने स्टाफ रजिस्टे्रशन करताना फक्त पाच कामगार असल्याची नोंद पालिकेकडे केली. मात्र प्रत्यक्षात जास्त कामगारांना या ठिकाणी ठेवले जात होते. या कामगारांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठीही कोणतीही व्यवस्था किंवा सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे सहाय्यक आयुक्त अजित कुमार अंबी यांनी सांगितले. भाडेकरूला जागा देताना पोलिसांकडून व्हेरिफिकेशन करून घेणे बंधनकारक असताना मालकाने तेदेखील केले नसल्याचे अंबी म्हणाले. भानू फरसाणच्या गाळ्यामध्ये डिझेल भट्ट्या, डिझेल वॉईल, एलपीजी गॅस सिलिंडर, पॅकिंग मेटरियल, खाद्यपदार्थांचा साठा, तेल, मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वायरिंग, लाकडी फर्निचर होते. यामुळे आग जास्त भडकल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परिणामी आगीत गुदमरून, उष्णतेमुळे भाजून कामगारांचा मृत्यू झाल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, संबंधित फरसाण व्यावसायिक भानुशाली याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages