"मतिमंद पुनर्वसन व्यवसाय केंद्र" उभारण्यास पालिकेची मंजुरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"मतिमंद पुनर्वसन व्यवसाय केंद्र" उभारण्यास पालिकेची मंजुरी

Share This

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाबरोबर काही शाळांमध्ये मतिमंद मुलांकरिता शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता महापालिकने पुढाकार घेऊन "मतिमंद पुनर्वसन व्यवसाय केंद्र" उभारावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. सईदा खान यांची ठरावाची सूचना महापालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेद्वारे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाबरोबर काही शाळांमध्ये मतिमंद मुलांकरिता शालेय वर्ग चालवले जातात. या मुलांना वयाच्या १८ व्या वर्षापर्यंतच शिकवले जाते. १८ व्या वर्षावरीलमतिमंद मुलांची महापालिका जबाबदारी घेत नाही. शाळेत येणारे मतिमंद विद्यार्थी सर्वसामान्य व गरीब वर्गातील असतात. या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांचे पालक अशिक्षित असतात. यामुळे या मुलांचा शैक्षणिक, मानसिक व बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टीने शहरात उपलब्ध असलेल्या विविध व्यवसायाभिमुख केंद्रांमध्ये जाऊन त्यांना प्रशिक्षण देणे त्यांच्या पालकांना शक्य होत नाही. परिणामी त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पालकांना सातत्याने भेडसावत असतो. यामुळे अशा १८ वर्षांवरील मतिमंद मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता पालिकेने पुढाकार घेऊन "मतिमंद पुनर्वसन व्यवसाय केंद्र" उभारावे अशी ठरावाची सूचना सईदा खान पालिका सभागृहात यांनी मांडली होती. या व्यवसाय केंद्रातून खाकी पिशव्या, फाईल्स, भेटकार्ड, कंदील, मेणबत्या इत्यादी वस्तू बनविणे, पणत्या रंगविणे, भाज्या व कडधान्यांची पाकिटे बनविण्याचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून त्यांच्या चरितार्थाची कायमस्वरूपी सोय होईल अशी सूचना सईदा खान यांनी केली होती. सईदा खान यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला पालिका सभागृहाने मंजूरी दिली आहे. या ठरावाच्या सूचनेवर पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages