दुर्घटनाग्रस्तांच्या वारसांना पालिकेच्या नोकरीतील २ टक्के जागा राखीव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुर्घटनाग्रस्तांच्या वारसांना पालिकेच्या नोकरीतील २ टक्के जागा राखीव

Share This

शारदा घोडेस्वार यांच्या मुलाला नोकरी -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत झाड पडून, मॅनहोल उघडे राहिल्याने त्यामध्ये पडून नागरिकांचा मृत्यू होतो. यातील बहुतेक दुर्घटना या महापालिकेच्या चुकीमुळे व दुर्लक्षामुळे घडलेल्या असतात. दुर्घटनेत एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. यामुळे वृक्ष पडून किंवा महापालिकेच्या चुकीमुळे, दुर्लक्षामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नेतेवाईकाला पालिकेची नोकरी देण्यासाठी २ टक्के जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये २०११ला नरिमन पॉईंट येथे आयनॉक्स थिएटर जवळ वादाचे झाड पडून एक महिला व तिची सहा महिन्याची मुलगी मृत्युमुखी पडली. वर्सोवा येथे पंचमार्ग उद्यानातील नारळाचे झाड पडून वेदप्रकाश आर्य यांचा मृत्यू झाला. जुलै २०१७ला चेंबूर स्वस्तिक पार्क येथे नारळाचे झाड पडून कांचननाथ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चेंबूरमध्येच बसची वाट बघत बसलेल्या शारदा घोडेस्वार यांच्या अंगावर नारळाचे झाड पडून मृत्यू झाला. २६ जुलै २०१७ ला घाटकोपर रमाबाई कॉलनीत शाळेवर झाड पडून फराह सलीम सय्यद व प्रणाली अनिल मोरे हे दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. मुंबईत नजीकच्या काळात नैसर्गिक दृष्टीने वृक्ष कोसळून किंवा इतर दुर्घटना घडून त्यामध्ये जीवितहानी, वित्तहानी, शारीरिक हानी, वाहनांचे नुकसान होणे, अशा अनेक घटना घडत आहेत. यात वृक्ष पडून मोठ्या प्रमाणात नागरिकांचं मृत्यू होत आहे. वृक्ष लागवडीपासून वृक्ष तोडीपर्यंत सर्व अधिकार मुंबई महानगरपालिकेकडे आहेत. वृक्ष पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाचा आधार हरपल्याने त्याच्या कुटुंबीयांची परवड होते. यामुळे पालिकेने या दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची जबाबदारी पालिकेने घ्यावी. दुर्घटना घडल्यास जखमींचा वैद्यकीय खर्च पालिकेने उचलावा, जखमींना आर्थिक मदत करावी, तसेच आपत्कालीन परिस्थिती मृत्यू झालेल्यांच्या वारसाला पालिकेच्या नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी २ टक्के जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पालिका गटनेत्यांच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी स्सादार करण्यात आला आहे. पुढील गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

शारदा घोडेस्वार यांच्या मुलाला नोकरी - 
चेंबूर स्वस्तिक पार्क येथे बसची वाट बघत बसलेल्या शारदा घोडेस्वार यांच्या अंगावर नारळाचे झाड पडून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन लहान मुले असा परिवार आहे. शारदा घोडेस्वार या एकमेव कमावत्या होत्या. त्यांच्यावर अंतिम कार्य करताना त्यांच्या कुटुंबियांना व्याजाने पैसे घ्यावे लागले होते. शारदा यांच्या मृत्यू नंतर त्यांचे पती सहदेव घोडेस्वार मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना ते शक्य होत नाही. पालिकेचे धोकादायक स्थितीतील झाडांकडे दुर्लक्ष होत असल्याने दुर्घटना घडून नागरिकांचा मृत्यू होत आहे. याबाबत पालिकेने मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून शारदा यांचा मुलगा सुमित घोडेस्वार (१९ वर्षे) याला विशेष बाब म्हणून पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे व त्यांच्या कुटुंबियांना जास्तीतजास्त आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका व एम पूर्व प्रभाग समितीच्या अध्यक्षा समृद्धी काते यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी सदर करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages