सेलिब्रिटींच्या घराजवळही "फेरीवाला झोन" - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सेलिब्रिटींच्या घराजवळही "फेरीवाला झोन"

Share This

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महामहापालिकेने फेरीवाला धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी फेरीवाल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये राज ठाकरे यांच्या घराबाहेर फेरीवाला झोन बनवण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर मनसेने त्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांच्या घराजवळ फेरीवाले बसणार असल्याने राजकीय वादाला सुरुवात झाली असतानाच मुंबईतल्या सेलीब्रिटींच्या घरासमोरही फेरीवाला झोन बनवले जाणार असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अभिनेता संजय दत्त यांच्या पाली हीलच्या घराबाहेर १० फेरीवाले, अमिर खान यांच्या बांद्रा येथील घरासमोरच्या रस्त्यावर १० फेरीवाले, नाना पाटेकर यांच्या माटुंग्याच्या घराबाहेरच्या सेनापती बापट रोडवर सुमारे १०० फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. सिद्धार्थ जाधव यांच्या घरासमोर तसेच वंदना गुप्ते यांच्या शिवाजी पार्कच्या घरासमोर, नीना कुलकर्णी यांच्या माहिमच्या घरासमोरच्या रस्त्यावर, सोनाली कुलकर्णी यांच्या एस व्ही रोडच्या घराबाहेरही फेरीवाले बसणार आहेत. तर नारायण राणे यांच्या जुहू तारा रोडच्या घरासमोर ३६ फेरीवाल्यांना बसण्याच्या जागा निश्चित करण्यात आल्य़ा आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सलमान खान, शाहरुख खान तसेच शिल्पा शेट्टी यांच्या घराजवळ फेरीवाले बसणार नसल्याचे यादीनुसार स्पष्ट झाले आहे. या यादीबाबत हरकती, सूचनांच्या छाननीनंतरच या जागांबाबतच्या यादीला कोणी व किती जणांनी विरोध केला आहे, हे 31 जानेवारीनंतरच समजू शकणार आहे. राज ठाकरे यांच्या घराबाहेर फेरीवाला झोन बनवल्याने त्याला विरोध केला आहे. तसाच विरोध म्हणून त्यांनी पालिकेकडे हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. आता सेलिब्रिटींच्या घराजवळही "फेरीवाला झोन" जाहीर झाल्याने त्याच्या विरोधात हे सेलिब्रिटी पालिकेकडे हरकती दाखल करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages