मंत्रालयात आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी आरोग्यमंत्र्यांकडून जागेची पाहणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मंत्रालयात आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी आरोग्यमंत्र्यांकडून जागेची पाहणी

Share This

मुंबई, दि. 21 - मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणीसाठी मंत्रालय दवाखाना आहे. त्याला आज आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली व उपलब्ध औषध साठ्याचीही माहिती घेतली. मंत्रालयात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास तशी सोय या ठिकाणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

आपत्कालीन परिस्थितीत गोल्डन अवर मध्ये उपचार मिळावे यासाठी मंत्रालय दवाखान्याकरिता शेड्यूल ड्रग व्यतिरिक्त बाहेरून आणावयाच्या अत्यावश्यक औषधांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर मंत्रालयाच्या प्रांगणात आपत्कालीन वैद्यकीय उपचारासाठी जागा देण्याबाबत मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे भविष्यात मंत्रालयात वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास तातडीचे उपचार करणे शक्य होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी, येणारे अभ्यागत यांना बऱ्याचदा वैद्यकीय उपचाराच्या आणीबाणीला सामोरे जावे लागले आहे. या परिस्थितीत नजीकच्या सेंट जॉर्ज, जे. जे. अथवा जी.टी हॉस्पिटल येथे रुग्णाला उपचारासाठी संदर्भित केले जाते. रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीतील गोल्डन अवरमध्ये जर प्राथमिक उपचार मिळाले तर त्याला जीवदान मिळू शकते. मंत्रालयाच्या दवाखान्यात सध्यातरी अशी सोय नाही. याची दखल घेऊन आरोग्यमंत्र्यांनी आज दुपारी या दवाखान्यास भेट देऊन पाहणी केली आणि तातडीच्या उपचाराची सुविधा निर्माण होण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. तसेच दवाखान्यातील औषधसाठ्याची माहिती घेतली.

रक्तदाब, छातीत दुखू लागल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांना यावर तातडीचा प्राथमिक उपचार म्हणून देण्यात येणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेसाठी विशेष निधी तातडीने देऊ, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. अशा औषधांची यादी देण्याची सूचना वैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे यांना यावेळी दिली. विषबाधा, हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीने उपचाराची सोय होण्याची व्यवस्था आणि प्रथमोपचाराबाबत यावेळी त्यांनी चर्चा केली. या दवाखान्यात ट्रॉप टी, ईसीजी चाचण्यांची सुविधा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रालयाच्या मागील बाजूस असलेल्या वाहनतळाजवळ 108 क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेसाठी जागा दिली आहे. त्याची देखील पाहणी आरोग्यमंत्र्यांनी केली. या जागेचा वापर आपत्कालीन उपचाराच्या सुविधेकरिता करता येईल का याबाबत विचार करून तशी मागणी करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages