ते सहा नगरसेवक चार महिन्यानंतर सभागृहात उपस्थित राहणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ते सहा नगरसेवक चार महिन्यानंतर सभागृहात उपस्थित राहणार

Share This

मुंबई | प्रतिनिधी -
मनसेच्या सहा नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या नगरसेवकांनी स्थापन केलेल्या गटाला मान्यता देऊ नये अशी तक्रार कोंकण आयुक्तांकडे करण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल नुकताच या नगरसेवकांच्या बाजूने लागला आहे. यामुळे आता हे सहाही नगरसेवक चार महिन्यानंतर येत्या 15 फेब्रुवारीला होणा-या पालिका सभागृहात उपस्थित राहणार आहेत. या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढल्याने सभागृहात भगवे फेटे घालून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

मागील वर्षीच्या 13 ऑक्टोबरला मनसेच्या सात पैकी दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून मनसेसह भाजपलाही जोरदार धक्का दिला. मात्र वेगऴा गट स्थापन करून शिवसेनेत अधिकृत प्रवेश करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांची मान्यता मिळणे आवश्यक होते. मात्र याचवेळी मनसेने आयुक्तांकडे तक्रार करून या सहा नगरसेवकांच्या गटाला मान्यता न देता त्यांचे पद रद्द करा, त्यांना कोणत्याही समित्यांच्या बैठकांना बसू देऊ नये अशी तक्रार करण्यात आल्याने त्यांचा पक्षप्रवेश मागील चार महिन्यांपासून रखडला होता. या सहा नगरसेवकांच्या शिवसेनेत प्रवेशावर काही दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी शिवसेनेच्या 93 नगरसेवकांच्या गटाला मान्यता दिली. तसे पत्र पालिका आयुक्तांना पाठवल्याने पालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तशी घोषणा केली. शिवसेनेचे संख्याबळ आता 87 वरून 93 झाले आहे. या सहाही नगरसेवकांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे या नगरसेवकांना चार महिन्यानंतर सभागृहात बसायला मिळणार आहे. येत्या 15 फेब्रुवारीला सभागृह असून या दिवशी हे नगरसेवक एकत्रित भगवे फेटे बांधून प्रवेश करणार असून शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages