Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे टर्मिनससाठी ‘बीकेसी’मधील जमिनीचे हस्तांतरण


मुंबई - मुंबई-अहमदाबाद हायस्पीड (बुलेट ट्रेन) रेल्वेसाठी वांद्रे कुर्ला संकुल येथे उभारण्यात येणाऱ्या हायस्पीड टर्मिनससाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची जमीन नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडला हस्तांतरित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज हा कार्यक्रम झाला. 

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पांतर्गत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भुयारी हायस्पीड टर्मिनस उभारण्यात येणार आहे. यासाठी भूगर्भाखाली 4.6 हेक्टर तर त्याच्यावर 0.9 हेक्टर जमीन नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडला ‘एमएमआरडीए’च्या वतीने देण्यात आली आहे. यासंबंधीची कागदपत्रे आज मुख्यमंत्री फडणवीस व रेल्वेमंत्री गोयल यांच्या उपस्थितीत ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खाडे यांच्याकडे सुपूर्द केली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन, जपानचे वाणिज्यदूत रिओजी नोडा, खासदार कपिल पाटील, आमदार आशिष शेलार यांच्यासह जपानच्या सल्लागार कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाअंतर्गत बांद्रा कुर्ला संकुल येथे हायस्पीड टर्मिनल उभारण्यात येणार आहे. यामध्ये जमिनीच्या आत 25 मीटर खोल त्रिस्तरीय टर्मिनल उभारण्यात येणार आहे. तसेच या टर्मिनसच्या वरील भागातील जमिनीवर इमारतीचे बांधकाम असणार आहे.

मुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांनी केला लोकलमधून प्रवास - 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील कार्यक्रम संपल्यानंतर परळ येथील रेल्वे पादचारी पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी लोकलमधून परळ रेल्वेस्थानकापर्यंतचा प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom