कर्जमाफी देणं हे येडयागबाळयाचं काम नाही –धनंजय मुंडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कर्जमाफी देणं हे येडयागबाळयाचं काम नाही –धनंजय मुंडे

Share This

सटाणा ( नाशिक ) - २००८ साली पवार साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी विनासायास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दिली होती. पण सरकारला इतके महिने होऊनही कर्जमाफी द्यायला जमली नाही.शेवटी 'इथे पाहीजे जातीचे हे येडया गबाळ्याचे काम नाही' अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत सरकारवर टोला लगावला.

यावेळी पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, हल्लाबोल यात्रेचा हा तिसरा टप्पा चालू आहे. मला विश्वास आहे जेव्हा पाचवा टप्पा संपायला येईल तोपर्यंत राज्यातील भाजपचे सरकार उलथायला सुरुवात झालेली असेल.भाजपला मत देऊन आमच्याकडून चूक झाली, असा संदेश लिहिलेले डिजीटल फलक देशात सर्वात पहिल्यांदा #सटाणा तालुक्यात लागले होते. हा तालुका जे बोलला ते आता महाराष्ट्र आणि देश बोलू लागला आहे. 2014 झालेली ही चूक आता 2019 ला दुरुस्त करायची असल्याचे आवाहन केले.

मोदींजीनी निवडणूकीआधी १५ लाख प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर येतील असं सांगितलं. ते तर सोडाच पण विजय मल्ल्या, नीरव मोदी हजारो कोटी बुडवून पळालेत त्यावरून जनतेच्याच डोक्यावर प्रत्येकी १५ लाख कर्ज होते की काय अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

हो गयी भूल कमल का फूल हा विचार लक्षात ठेवा – सुनिल तटकरे
हो गयी भूल कमल का फूल हा विचार लक्षात घेवून या सरकारला वठणीवर आणण्याचा निर्धार करुन कामाला लागूया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना नाशिकचा जास्तीत जास्त भाग ओलिताखाली आणला होता. मी जलसंपदा मंत्री म्हणून काम करत असताना नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावले होते.नार-पार, दमणगंगाचे पाणी गुजरातला जावू देणार नाही असा निर्धार आज करुया त्यासाठी आपल्याला पुन्हा हल्लाबोल करावा लागला तरी तो आम्ही करु असे आश्वासनही तटकरे यांनी दिले. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यासाठी हल्लाबोल करण्याची गरज आहे. जसा रात्री नंतर पुन्हा दिवस उजाडतो. त्याप्रमाणे भाजपची सत्ताही जाणार आहे असेही तटकरे म्हणाले.

तीन वर्षात महाराष्ट्रात स्त्रीभ्रृण हत्येचं प्रमाण वाढले - खासदार सुप्रिया सुळे
तीन वर्षात महाराष्ट्रात स्त्रीभ्रृण हत्येचं प्रमाण वाढले आहे त्यामुळे राज्यातील मुलींची संख्या घटल्याचे नीती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढाओ अशी भल्यामोठया जाहीराती केल्या जात आहेत आणि दुसरीकडे मुलींची संख्या घटत आहे. त्यामुळे आज लेकी नको गं म्हणण्याची वेळ राज्यातील लोकांवर आलीय की काय अशी शंका मला येते असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत व्यक्त करतानाच सरकारबद्दल संतापही व्यक्त केला.त्यांनी या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव देण्याचा आणि सटाणा कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,खासदार सुप्रिया सुळे,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार दिपिका चव्हाण,आमदार पंकज भुजबळ, आमदार जयंत जाधव, आमदार जयदेव गायकवाड,जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार,युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार संजय चव्हाण,माजी खासदार आनंद परांजपे,रंजन ठाकरे,अविनाश आदीक,प्रेरणा बलकवडे, आदींसह बागलाण आणि सटाणा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे ,खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages