मुंबई । प्रतिनिधी -
नागरिकांच्या रेशनिंग समस्यांच्या संदर्भात घाटकोपर पूर्वेतील रेशनिंग कार्यालयावर अखिल भारतीय सेनेचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. अभासेचे विभाग प्रमुख जयवंतराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणारा हा मोर्चा बुधवार दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पंतनगर टेक्निकल हायस्कुल येथून निघणार आहे. शेकडोंच्या संख्यने निघणाऱ्या या मोर्चाला संबोधित करण्यासाठी अखिल भारतीय सेनेच्या सरचिटणीस आशाताई गवळी ( मम्मी ) या उपस्थित राहणार असल्याचं विभाग प्रमुख जयवंत वाघमारे यांनी सांगितले.
रेशनिंग कार्ड असूनही धान्य न मिळणे, रेशनकार्डवर नाव वाढवून न मिळणे, पुरावे असून देखील रेशनकार्ड बनवण्यास अडचण, रेशनकार्डवर मिळणारे गहू, तांदूळ खूपच निकृष्ट दर्जाचे या आणि अशा अनेक समस्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 34 ई रेशनिंग कार्यालयातील अधिकाऱ्याकडून नागरिकांना कोणतेही मार्गदर्शन अथवा सहकार्य होत नसल्याने अशा अधिकाऱ्यांना धारेवर धरून व नागरिकांना अत्यंत खराब गहू, तांदूळ रेशनवर देणाऱ्यांना आम्ही या मोर्चातून नागरिकांनी रेशन दुकानातून विकत घेतलेले गहू, तांदूळ अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जयवंतराव वाघमारे यांनी सांगितले. या मोर्चात प्रमुख सल्लागार अविनाश जोशी, तालुका अध्यक्ष वैभव कंक, रामचंद्र जाधव, कृष्णा काकडे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.