१७ कोटी ६१ लाखांचा मालमत्ता कर थकविणा-या ६ मालमत्ता 'सील' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 March 2018

१७ कोटी ६१ लाखांचा मालमत्ता कर थकविणा-या ६ मालमत्ता 'सील'


४ मालमत्तांचा कर भरल्याने 'सील' काढले -
मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर थकवणा-या आणि वारंवार मागणी करुनही मालमत्ता कर न भरणा-यांबाबत सुरु करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत आता आणखी १० मालमत्तांवर 'सील' कारवाई करण्यात आली. मात्र यापैकी ४ मालमत्ताधारकांनी सील कारवाई नंतर पैसे भरल्याने सदर सील काढण्यात आले आहे. उर्वरित ६ मालमत्तांमध्ये 'एफ दक्षिण' विभागातील ४ मालमत्ता, 'आर मध्य' विभागातील एक मालमत्ता आणि 'टी' विभागातील एक मालमत्ता यांचा समावेश आहे. या ६ मालमत्तांवर एकूण रुपये १७ कोटी ६१ लाख ६६ हजार ७९० एवढा मालमत्ता कर थकित आहे. यामध्ये दादर-नायगाव रस्त्यावरील २ भूखंड, जेरबाई वाडीया मार्गावरील १ भूखंड, किडवई मार्गावरील १ भूखंड; बोरिवली पश्चिम आणि मुलुंड पश्चिम परिसरातील प्रत्येकी एक याप्रमाणे २ व्यवसायिक मालमत्तांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेचे करनिर्धारक व संकलक तथा सहाय्यक आयुक्त देविदास क्षीरसागर यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थकवणा-यांवरील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत मार्चच्या पहिल्या आठवड्यात २८ कोटींचा मालमत्ता कर थकविणा-या ७ मालमत्तांवर 'सील' कारवाई करण्यात आली होती. यानंतर आता आणखी ६ मालमत्तांवर सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्ता धारकांनी एकूण १७ कोटी ६१ लाख ६६ हजार ७९० एवढा मालमत्ता कर थकविला आहे. 'सील' कारवाई करण्यात आलेल्या ६ मालमत्तांमध्ये 'एफ दक्षिण' विभागातील दादर-नायगाव मार्गावरील बांधकामाखाली असलेल्या मे. बॉम्बे डाइंग या मालमत्ताधारकाच्या २ भूखंडांचा समावेश आहे. यावर अनुक्रमे रुपये ८ कोटी ५४ लाख ८० हजार ९६४ आणि रुपये ४ कोटी ४५ लाख २६ हजार ४४९ एवढा मालमत्ता कर थकित आहे. तर याच विभागातील जेरबाई वाडीया मार्गावरील मे. जी. एम. ग्रुप क्रिएटर्स या मालमत्ता धारकाच्या बांधकामाखाली असलेल्या जमिनीवर रुपये १ कोटी ४० लाख ६८ हजार ६१२ एवढा मालमत्ता कर थकित आहे. याच विभागातील रफी अहमद किडवई मार्गावरील मे. मयुर बिल्डर्स यांच्या बांधकामाखाली असलेल्या जमिनीचा रुपये ६ लाख ३५ हजार १६१ एवढा मालमत्ता कर थकित असल्याने 'सील' कारवाई करण्यात आली आहे. 'आर मध्य' विभागातील बोरिवली परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गावरील गोकुळ शॉपिंग सेंटर (घनश्याम कंन्स्ट्रक्शन) संबंधित मालमत्ता धारकांनी रुपये ९० लाख २१ हजार ९१३ एवढा मालमत्ता कर थकविल्याने मालमत्ता कर थकित असलेला भाग 'सील' केला आहे. तसेच 'टी' विभागातील मुलुंड पश्चिम येथील बाल राजेश्वर मार्गावर असणा-या स्वप्ननगरी परिसरातील मे. ऍरिस्टो डेव्हलपर्स यांच्या व्यवसायिक इमारतीचे २ मुख्य दरवाजे रुपये २ कोटी २४ लाख ३३ हजार ६९१ इतक्या थकित मालमत्ता कराच्या वसूलीसाठी 'सील' करण्यात आले आहेत. या ६ मालमत्तांव्यतिरिक्त आणखी ४ मालमत्ता देखील 'सील' करण्यात आल्या होत्या. मात्र या मालमत्ता धारकांनी त्यांच्या मालमत्तांवर थकित असलेल्या रुपये १ कोटी २२ लाख ८५ हजार ४८२ एवढ्या मालमत्ता कराचा भरणा केल्याने सदर सील काढण्यात आले आहे. यामध्ये 'एफ दक्षिण' विभागातील ३ मालमत्ता (भूखंड) आणि 'आर मध्य' विभागातील पुनर्विकासांतर्गत असलेल्या एका इमारतीचा समावेश आहे.

मालमत्ता कर वसूलीचे टप्पे - 
महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराची देयके प्राप्त झाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. जे मालमत्ता धारक ९० दिवसांच्या मुदतीत मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांच्यावर टप्पेनिहाय कारवाई सुरु करण्यात येते. यामध्ये सर्वप्रथम महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क व संवाद साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही देयक अदा न केल्यास 'डिमांड लेटर' पाठविले जाते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात २१ दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ता धारकास दिली जाते. त्यानंतरच्या टप्प्यात मालमत्ता किंवा मालमत्तेचा काही भाग 'सील' करण्याची कारवाई केली जाते, त्यानंतर मालमत्ता व्यवसायिक स्वरुपाची असल्यास जलजोडणी खंडीत करण्याची कारवाई देखील केली जाते. तर शेवटच्या टप्प्यामध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाते; अशीही माहिती देविदास क्षीरसागर यांनी दिली आहे.

Post Bottom Ad