पालिकेच्या ऑक्टोबर महिन्यात बँकांमध्ये ६७ हजार कोटींच्या ठेवी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या ऑक्टोबर महिन्यात बँकांमध्ये ६७ हजार कोटींच्या ठेवी

Share This

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेकडून विविध बँकांमध्ये कंत्राटदारांच्या परताव्याच्या रकमा, कर्मचाऱयांच्या पी.एफ.च्या रकमा, वार्षिक अर्थसंकल्पात न वापरलेला निधी विविध बँकांमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवला जातो. महापालिकेकडून विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवींचा आकडा दरमहिन्याला वाढतच आहे. ऑक्टोबर २०१७ मधील पालिकेच्या बँकांमधील ठेवींची माहिती स्थायी समितीच्या माहितीसाठी सादर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार पालिकेच्या विविध बँकांमध्ये ६७ हजार ७४१.९२ कोटीच्या मुदत ठेवी होत्या.

मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प एका लहान राज्याच्या बरोबरीचा आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्प गेल्या काही वर्षात फुगत जाऊन ३७ हजार कोटींपर्यंत गेला होता. सन २०१७ - १८ ला वास्तववादी अर्थसंकल्प सादर करत २५ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्रमहापालिकेच्या अर्थसंकल्पातील रक्कमा खर्चच होत नसल्याने अर्थसंकल्पाचा आकडा कमी होऊनही बँकांमध्ये गुंतवल्या जाणाऱ्या रक्कमेत कमी आलेली नाही. जून २०१७ पर्यंत विविध बँकांमध्ये पालिकेच्या ६४ हजार ४८२.६४ कोटींच्या ठेवी होत्या. जुलै २०१७ मध्ये मुदत ठेवींचा आकडा ६५ हजार ४८४.३१ कोटी रुपये इतका झाला होता. सप्टेंबरमध्ये हा आकडा ६६ हजार ६२८. ३० कोटीं इतका झाला होता. ऑक्टोबर महिन्या अखेरीस हा आकडा ६७ हजार ७४१.९२ कोटी रुपये इतके झाला होता. या रक्कमेवर पालिकेला बँकांकडून किमान दरसाल ५.९५ ते ६.७५ टक्के इतके व्याज मिळत असते. मुंबई महापालिकेकडून बँकांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या मुदत ठेवीबाबतची माहिती काही वर्षांपूर्वीपर्यंत महापौर, गटनेते, नगरसेवक आदींना दिली जात नव्हती. मात्र या ठेवींबाबत स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक विशेषतः राष्ट्रवादीचे माजी गटनेते धनंजय पिसाळ यांनी सातत्याने वाचा फोडायला आणि जाब विचारायला सुरुवात केल्यानंतर प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत विविध बँकांमधील मुदत ठेवींच्या रकमांबाबत माहिती सादर करण्यास सुरुवात केली. त्यानुसार दरमहिन्याला मुदत ठेवीची माहिती स्थायी समितीच्या माहितीसाठी सादर करण्यात येते. सध्या मार्च २०१८ अखेरीस या बँकांमध्ये ६९ हजार १३५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. यामध्ये २१ हजार १७६ कोटी रुपये भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, उपदान निधी, मुदत ठेवी, इतर विशेष निधी, कंत्राटदार आणि इतर पक्षकारांची ठेव रक्कम म्हणून ठेवी आहेत. तर इतर रक्कम पालिकेची खर्च न झालेली रक्कम आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages