मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याची टिका होत असताना शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हजर राहत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. शिक्षक शाळांमध्ये उपस्थित राहत नसल्याने महापालिकेने 20 शिक्षकांना निलंबित केले आहे. निलंबन केलेल्यांमध्ये 12 शिक्षिका व 8 शिक्षकांचा समावेश आहे. यात 4 मुख्याध्यापकांचा समावेश आहे. दरम्यान ही कारवाई शाळा गुणवत्ता वाढीसाठी उचललेले हे एक प्रशासकीय पाऊल असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
महापालिका शाळांतील गुणवत्ता ढासळल्याची टीका सातत्याने केली जाते. गुणवत्ता वाढवण्यासाठी पालिकेचे शिक्षण खात्याचा प्रयत्न आहे. यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करून विविध उपक्रम राबवले जात आहेत. असे असताना अनधिकृत गैरहजर राहणे, शाळेची कमी शैक्षणिक गुणवत्ता आणि अनुषंगाने पर्यवेक्षकीय कर्तव्यातील कुचराई, अनधिकृतरित्या बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणे, कर्तव्यात कसूर करणे या कारणांसाठी निलंबित करण्यात आले आल्याचे प्रशासनाने म्ह्टले आहे. धक्कादायक म्हणजे यांत यांत चार मुख्याध्यापक असून त्यातील एकाने शाळेतील विद्यार्थींनीसोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी निलंबन करण्यात आले आहे. निलंबित केलेल्या शिक्षकांमध्ये 2014 पासून अनधिकृतपणे गैरहजर राहणा-या एका शिक्षिकेचा समावेश आहे. निलंबनाच्या कारवाईमध्ये मुख्याध्यापकही असल्याने शाळेची गुणवत्ता कशी सुधारणार असा सवाल विचारला जातो आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्यामार्फत 8 माध्य़मांमध्ये शिक्षण दिले जाते. मनपा प्राथमिक शाळांमध्ये सध्या 2 लाख 66 हजार 22 विद्यार्थी असून त्यांना 10 हजार 202 शिक्षकांमार्फत शिक्षण दिले जाते. या व्यतिरिक्त 149 माध्यमिक शाळांमधील 30 हजार 393 विद्यार्थ्यांना 1 हजार 153 शिक्षकांमार्फत शिक्षण दिले जाते. तर विशेष मुलांच्या 17 शाळांमधील 846 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी 91 शिक्षक कार्यरत आहेत. निलंबित केलेल्या मुख्याध्यापकांमध्ये एल विभागातील मोहिली व्हिलेज येथील मुंबई पब्लिकस्कूलच्या मुख्याध्यापिका यशोदा देवेंद्र त्रिपाटी, के पश्चिम विभागातील डी. एन. नगर हिंदी शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र सिंह, जी उत्तर विभागातील माटुंगा लेबर कॅम्प शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विनायक सोहनी आणि काळबादेवी मनपा शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर कुदळे यांचा समावेश आहे.