पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका पंपांवर ५४ कोटी रुपये खर्च करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 March 2018

पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका पंपांवर ५४ कोटी रुपये खर्च करणार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका खाजगी कंत्राटदाराकडून भाडेतत्वावर पंप घेते. यावर्षी मुंबई महापालिका अशा पंपावर ५४ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबईत अतिवृष्टी झाल्यास व त्याच वेळी समुद्राला मोठी भरती असल्यास शहर व उपनगरे येथील सखल भागात पाणी तुंबते व त्याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो. २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टी व समुद्राला आलेली मोठी भरती यामुळे मुंबईची तुंबई होऊन मोठी वित्तीय आणि जीवित हानी झाली होती. तेव्हापासून मुंबई महापालिका पावसाळ्यात मुंबई तुंबू नये व त्याचा रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना राबवत आहे. पालिकेने ५ ठिकाणी एका सेकंदाला ३० ते ३६ हजार दशलक्ष लिटर पाण्याचा निचरा करणाऱ्या पम्पिंग स्टेशनची उभारणी करून ते कार्यान्वित केल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ज्या सखल भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाचे पाणी साचते, तेथे त्या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका दरवर्षी कमी-अधिक क्षमतेचे पंप कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेते. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. .

गेल्या वर्षी पालिकेने २९५ पंप भाडेतत्त्वावर घेतले होते. यंदा २४ वॉर्ड व २ रुग्णालये असे एकूण १४ गट निर्माण करून २७९ पंप भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये कुर्ला विभागात सर्वाधिक २६ पंप, त्याखालोखाल परळ विभागात २३ पंप बसवण्यात येणार आहेत. सर्वात कमी पंप केईएम रुग्णालय येथे २ पंप तर शीव रुग्णालय येथे ३ पंप बसवण्यात येणार आहेत. २५ मे ते १५ ऑक्टोबर या कालावधीत कंत्राटदारांच्या १४ गटांकडून पालिका २७९ पंप भाड्याने घेणार आहे. ताशी ६० घनमीटर पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपासाठी एका पाळीसाठी ७५० रुपये, १२५ घनमीटर पाणी उपसा क्षमता असलेल्या पंपासाठी एका पाळीसाठी ११०७ रुपये, १७५ घनमीटर पाणी उपसा क्षमता असलेल्या पंपासाठी एका पाळीसाठी २००७ रुपये आणि २५० घनमीटर पाणी उपसा क्षमता असलेल्या पंपासाठी एका पाळीसाठी १९२६ रुपये भाडे कंत्राटदारांना देण्यात येणार आहेत. एकूण २७९ पंपांसाठी ५४ कोटी ७ लाख ८९ हजार ३५० रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Post Bottom Ad