मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई पश्चिम उपनगरातील खार पश्चिम येथील चमडावाडी नाल्याच्या कल्व्हर्ट मधून ५७ इंच व्यासाची जलवाहिनी जाते. या जलवाहिनीमुळे कल्व्हर्टमधील पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. त्यामुळे ही जलवाहिनी तातडीने वळविण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. ही जलवाहिनी वळविल्यामुळे नाल्यातील पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे खार पश्चिम परिसरातील जयभारत सोसायटी आणि रेल्वे कॉलनी आदी परिसरातील पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होऊन या परिसरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काही नाल्यांची व पावसापूर्वी कामांची पाहणी केली. यावेळी चमडा वाडी नाल्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याचे आदेश जल अभियंता खात्याला दिले. वांद्रे पश्चिम परिसरात चमडावाडी नाला मिठी नदीला जिथे मिळतो, त्याच्या जवळ 'नंदादीप कल्व्हर्ट'आहे. या कल्व्हर्टच्या वरून पश्चिम द्रुतगती महामार्ग जातो. पश्चिम द्रुतगती महामार्गाचे परिरक्षण हे'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण / सार्वजनिक बांधकाम खाते' यांच्या अखत्यारित आहे.त्यामुळे या कल्व्हर्टच्या साफसफाईबाबत तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवावे, असेही आदेश दिले आहेत. येत्या पावसाळ्याच्या अनुषंगाने चमडावाडीच्या नाल्याच्या रुंदीकरणाचे व खोलीकरणाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. आतापर्यंत सरासरी २० टक्के काम झाले असून, उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती महापालिकेच्या पर्जन्यजल वाहिनी खात्याद्वारे देण्यात आली.