मुंबई । प्रतिनिधी - मुंबईच्या समुद्र व खाडी किनाऱ्याला लागून असलेली खारफूटी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बहुतेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे खारफूटींचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी धोरण पालिकेने ठोस धोरण तयार करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजीत दाभाडकर यांनी पालिका सभागृहात केली.
मुंबईतील खारफुटीची अनेक ठिकाणी बेसुमार कत्तल सुरु केली जात आहे. नगरसेवक याबाबत वारंवार आवाज उठवतात. मात्र महापालिका प्रशासनाकडून खारफुटीच्या संरक्षण व संवर्धनासाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी खारफूटींवर अतिक्रमणे वाढू लागली आहेत. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी पालिकेने ठोस नियमावली व धोरण तयार करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी दाभाडकर यांनी केली. तसेच शहराप्रमाणेच उपनगरात पर्यटन स्थळे बांधून त्यास चालना द्यावी, अशी ही मागणी केली. मुंबईत डासांच्या अळ्या सापडल्यास पालिका संबंधितांवर दंडात्मक कारवाई बरोबरच एफआयआर दाखल करते. अशी कारवाई मुंबईकरांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. मात्र, एफआयआर दाखल करण्या सारखीची टोकाची कारवाई करु नये. अशा कारवाईमुळे संबंधित नागरिकांना परदेशात तातडीने जाण्यासाठी विझा प्राप्त करताना त्याच्या नावावर एफआयआर दाखल असल्यास त्याचा विझा रद्द होतो. त्यामुळे पालिकेने याबाबत काळजी घ्यायला हवी, अशी सूचना दाभाडकर यांनी केली.