भिडेंना अटक करण्यासाठी सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 March 2018

भिडेंना अटक करण्यासाठी सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम - प्रकाश आंबेडकर


अन्यथा मंत्रालयाला घेराव घालू -
मुंबई । प्रतिनिधी - भीमा कोरेगांव प्रकरणी गुन्हा दाखल झालेले मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला तरी अद्याप अटक न झाल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आज एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीदरम्यान भिडेंना अटक करण्यासाठी आठ दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आठ दिवसात भिडे याना अटक न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करून मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

१ जानेवारीला भीमा कोरेगांव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक करण्यात आली होती. गाड्यांची मोडतोड करून काही गाड्या जाळण्यात आल्या होत्या. याप्रकरणी मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिलिंद एकबोटे यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असतात न्यायालयाने जामीन नाकारल्यावर एकबोटे यांना अटक करण्यात आली मात्र भिडे यांना अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट पसरली होती. जनतेमध्ये असलेल्या संतापाला मोकळी वाट करून देण्यासाठी तसेच भिडे हे सरकारचे जावई आहेत का याची सरकारला विचारणा करण्यासाठी आज आझाद मैदानात एल्गार मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाला ओबीसी, भीम आर्मी, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, लिंगायत समाज, मुस्लिम संघटना तसेच २५० संघटनांनी पाठिंबा दिला होता. भायखळा येथून निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. याची माहिती अनेकांना नसल्याने भायखळा येथुन मोर्चाचे काढण्यात आला. आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने ३५ ते ४० हजार लोक मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. याभेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या साड़ेतीन वर्षाच्या कार्यकाळात भीमा कोरेगांव दंगल हा डाग असल्याचे म्हटले. यावर मुख्यमंत्र्यांना हा डाग धुण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.यावेळी रावसाहेब पाटील यालाही अटक करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली.

सरकाराने भिडे याला अटक करून कोर्टात उभे करावे, कोर्ट पुढे काय ते बघेल सरकारने कोर्टाचे काम करू नये असे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. भिडे यांना प्रधानमंत्री मोदी पाठीशी घालत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केली. कुठल्या शेपटीवर पाय ठेवून कुठलं प्रकरण कधी बाहेर काढायचे हे आम्हाला चांगले माहीत असल्याचे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री मोठे नसून जनतेची ताकद मोठी आहे. या ताकदीपुढे सर्वाना झुकावेच लागते असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान यावेळी भीम आर्मीचे अशोक कांबळे, शैलेंद्र कांबळे, विश्वास उटगी, मराठा सेवा संघाचे दत्ताजी देसाई, यशवंत सेनेचे नवनाथ पडाळकर, आमदार हरिभाऊ भदे, इत्यादींनी मोर्चाला मार्गदर्शन केले.

सीएसटीएम व कुर्ला येथे रास्तारोको - 
मुंबईत निघालेल्या एल्गार मोर्च्याच्या दरम्यान आजहद मैदान व महापालिका मुख्यालयासमोर भीम अनुयायांनी रास्ता रोको केला. तसेच कुर्ला रेल्वे स्थानक येथेही रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोमुळे काही काळ याठिकाणी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. नंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालून रास्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत केली. एल्गार मोर्चाच्या दरम्यान आझाद मैदानात समोरील महापालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

Post Bottom Ad