मुंबई । प्रतिनिधी - मुंबईच्या पूर्व किनारपट्टीलगत चेंबूर ते मुंबईला जोडणा-या पूर्व मुक्त मार्गावरील पांजरापोळ बोगद्यात लावण्यात आलेले विद्युत दिवे चोरीला गेले आहेत. येथील वायरही जाळण्यात आल्याने पालिकेने अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केल्याची माहिती एम पूर्वचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली. तसेच बोगद्यातील अंधारामुळे वाहनचालकांना होणा-या संभाव्य त्रासाची शक्यता लक्षात घेऊन प्रकाश व्यवस्था पूर्ववत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या 'एम पूर्व' विभागाच्या हद्दीत पांजरापोळ परिसरात पूर्वमुक्त मार्गाचा काही भाग येतो. याच भागातील पूर्व मुक्त मार्गावर सुमारे ८०० मीटर लांबीचा व स्वतंत्र दुहेरी मार्गिका असणार वाहतूक बोगदा देखील आहे. या बोगद्यातील प्रकाश व्यवस्थेसाठी महापालिकेद्वारे विद्युत दिवे आणि विद्युत केबल बसविण्यात आली आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी समाज-विघातक प्रवृत्तींद्वारे बोगद्यातील केबल पूर्णपणे जाळण्यात आली.तसेच विद्युत दिवे आणि फिटींग्ज चोरल्याने महापालिकेने याबाबत पोलीसांत गुन्हा(FIR) दाखल केला आहे. यापूर्वी देखील बोगद्यातून दिवे चोरीच्या घटना घडल्या आहेत. वारंवार घडणा-या केबल चोरीच्या किंवा केबल जाळण्याच्या घटनामुळे विद्युत केबल जमिनीपासून २० फूट उंचावर बसविण्यात येणार आहे. तोपर्यंत वाहनचालकांच्या सुविधेच्या व सुरक्षेच्यादृष्टीने बोगद्यातील प्रकाश व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून जनित्र-संच (Generator Set) बसवून तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था कार्यान्वित करण्याचे काम सुरु झाले आहे. हे काम पुढील २४ तासात पूर्ण होईल. तसेच नियमित स्वरुपातील प्रकाश व्यवस्थेसाठी विद्युत केबल व विद्युत दिवे बसविण्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. हे काम पुढील २१ दिवसात पूर्ण होण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे. बोगद्यातील सुरक्षा व्यवस्था सक्षम केली जाणार असून येथे विनाशस्त्र सुरक्षा रक्षकांऐवजी सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमण्याचे प्रस्तावित आहे. यापूर्वी बोगद्यात केवळ 'हाय पावर सोडिअम वेपर' (HPSV) या प्रकारचे दिवे होते. आता काही सोडिअम वेपर दिव्यांसह 'एलईडी' प्रकारचे १२० दिवे बसविण्यात येणार आहेत. बोगद्याच्या दुहेरी मार्गिकेवर ६०-६० दिवे असतील.'एलईडी' दिवे बसवून वीज खर्चात बचत करण्याचा पालिकेचा मानस आहे. बोगद्याच्या वरील डोंगरावर असणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ही जागा जिल्हाधिका-यांच्या अखत्यारितील असल्याने 'जिल्हाधिकारी कार्यालय' व मुंबई पोलीस यांच्या सहकार्याने निष्कासन कारवाई करण्यात येणार असल्याचे किलजे यांनी सांगितले.