मुंबई - परीक्षेत पास करण्याच्या नावाखाली विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा प्रकार गेल्या आठवड्यात घाटकोपरमधील सुप्रसिद्ध अशा गुरुकुल शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षकास अटक केले. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने शिक्षकास निलंबित करण्याची कारवाई केली नाही. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन शिक्षकास पाठीशी घालत असल्याचा आरोप करत, शिक्षकाची हकालपट्टी करावी या मागणीसाठी पालकांनी सोमवारी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
घाटकोपर येथील डी. जे. दोशी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीस अकाऊंट्स विषयात कमी गुण पडले होेते. त्याबदल गुणांची वाढ करत पास करून देण्याच्या नावाखाली इम्रान खान या शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केला होता. शिक्षक खानवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, महाविद्यालयाने या शिक्षकाला नोकरीवरून निलंबित केले नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी होर्डिंग लावून या घटनेचा जाहीर निषेध केला. पालक व विद्यार्थ्यांनी जवळपास ३ तास ठिय्या आंदोलन करत शिक्षकाला तात्काळ नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी या वेळी करण्यात आली. शिक्षकाला काढून टाकले नाही, तर आम्ही आंदोलन चालूच ठेवू, असा इशारा पालक वर्गाकडून देण्यात आला. पालकांचे व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक खरबे यांना लेखी निवेदन सादर केले. पालकांच्या मागणीचा विचार करून त्या शिक्षकाची महाविद्यालयातून हकालपट्टी करत असल्याचे लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.