केईएम रुग्णालयाचे नाव डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय करा - मनसे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2018

केईएम रुग्णालयाचे नाव डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय करा - मनसे


मुंबई । प्रतिनिधी - भारतावर इंग्रजांनी दिडशे वर्षाहून अधिक राज्य केले. याकाळात इंग्रजांनी मुंबईत अनेक विकास कामे करत अनेक इमारती, रस्ते, विभागांना इंग्रजांची नावे देण्यात आली. देशाबाहेरील नागरिकांची नावे मुंबईमधील इमारती, रस्ते, विभागांना देण्यात येऊ नये असा ठराव महापालिकेत मंजूर करण्यात आला. मात्र त्यानंतरही महापालिकेच्या परेल येथील किंग एडवर्ड मेमोरियल म्हणजेच केईएम रुग्णालयाचे नाव अद्याप बदलण्यात आले नव्हते. फेरीवाले आणि अमराठी पाट्यांच्या विरोधात असलेल्या मनसेने आता आपला मोर्चा केईएम रुग्णालयाकडे वळविला आहे. ब्रिटीशकालीन नाव असलेल्या केईएम रुग्णालयाचे नामकरण करण्याची मागणी मनसेने केली आहे. त्यासाठी मनसेकडून महापौरांना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राद्वारे किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाचे नाव बदलून डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय असे नामकरण करण्याची मागणी केली आहे. मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी याबाबतची ठरावाची सूचनाही मांडली आहे.

केईएम हे मुंबईतील पालिकेचे मध्यवर्ती ठिकाणी असलेले रुग्णालय असून येथे रोज मोठ्या प्रमाणार रुग्ण दाखल होतात. या प्रसिध्द असलेल्या रुग्णालयाला ब्रिटिशकालीन नाव आहे. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त होऊनही आजमितीस सात दशके पूर्ण झाली. मात्र या गुलामगिरीतून मुक्त होण्याची वेळ आली आहे. केईएमच्या कर्तुत्वात भारतीयांचेही योगदान मोठे आहे. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन 70 वर्ष उलटून गेली. मात्र तरीही या रुग्णालयाला किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (केईएम) असे नाव अद्याप कायम ठेवण्यात आले आहे. हे नाव बदलून डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय असे नामकरण करावे अशी मनसेची मागणी आहे. डॉ.आनंदीबाई जोशी यांना 1886 साली एमडी पदवी मिळाली. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी बोटीने परदेशी जाणारी पहिली स्त्री आहे. हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी ही पहिली महिला आहे. एमडी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र असा होता. एमडी झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनही त्यांचे अभिनंदन झाले. केवळ 21 वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाई यांनी भारतीय स्त्रीयांसाठी प्रेरणादायी जीवन आदर्श उभा केला. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून दरवर्षी 26 फेब्रुवारी रोजी महिला आरोग्यदिन म्हणून साजरा केला जातो. हे योगदान लक्षात घेऊन केईएम रुग्णालयाचे ब्रिटीशकालीन बदलून भारतीय असलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी असे नाव देण्यात यावे अशी मागणी मनसेने ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका सभागृहाकडे केली आहे. या मागणीचे पत्रही नगरसेवक तुर्डे यांनी महापौर महाडेश्वर यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad