
मुंबई | प्रतिनिधी - राज्य शासन मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवून जलद , सुखकर प्रवासी वाहतूक होण्यासाठी मोनो रेल्वेसह मेट्रो रेल्वेवरही जास्तीत जास्त भर देत आहे . या दोन्ही रेल्वे मार्गाच्या रेल्वे ब्रिजखालील जागा मोठ्या प्रमाणात मोकळ्या अवस्थेत आहेत. त्यामुळे मेट्रो, मोनो रेल्वे पुलाखालील मोकळ्या जागेत व्हर्टिकल गार्डन बनविण्याची संकल्पना राबविल्यास 'स्वच्छ मुंबई व हरित मुंबई' या उक्तीचा प्रत्यय मुंबईकरांना येईल, अशा मागणीची मांडलेली ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजूर करण्यात आली. आयुक्तांच्या सकारात्मक अभिप्रायानंतर याबाबतची अंमलबजावणी करता येणार आहे.
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात नागरिकांसाठी, उद्याने, उपवने व मनोरंजन मैदानाची जागा निर्माण करणे, झाडे लावणे, त्याची जोपासणा करणे हे पालिका कायद्याअनुसार प्रशासनाचे कर्तव्य आहे. तसेच त्यासाठी जागा पहाणे, त्या जागा ताब्यात घेण्यासाठी त्यावर आरक्षण टाकणे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचा विकास करणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशी उद्याने, उपवने, मनोरंजन मैदाने यांच्या जागा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विरंगुळयाची आवडती ठिकाणे आहेत. तसेच रस्त्यालगत लावण्यात आलेल्या झाडांमुळे नागरिकांना शुद्ध हवा मिळते. मुंबईची वाढती लोकसंख्या व वाढते शहरीकरण यामुळे सध्या उद्याने, उपवने, मनोरंजन मैदाने यांसाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे मेट्रो, मोनो रेल्वे पुलाखालील मोकळ्या जागेत व्हर्टिकल गार्डन बनविण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका नेहल शाह यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती.
