शेतकरी राजा मुंबईत धडकला, सोमवारी विधानभवनाला घेराव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 March 2018

शेतकरी राजा मुंबईत धडकला, सोमवारी विधानभवनाला घेराव


मुंबई । प्रतिनिधी - 
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभावा द्यावा या व अन्य मागण्यांसाठी ६ मार्चला नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी मुंबईत धडकला. सोमवारी विधानभवनाला आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून घेराव घातला जाणार आहे. या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे इत्यादी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

संपूर्ण कर्जमाफी हवी, वनजमिनी भूमिहीन आदिवासींच्या मालकीची व्हावी, वृद्धापकाळात शेतकऱ्यांना निवृत्ती पेन्शन योजना लागू करावी, गुजरात राज्याच्या फायद्याचा नद्याजोड प्रकल्प रद्द करावा, सर्व शेतकऱ्यांना नवीन रेशनकार्ड द्यावीत, प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे घर मिळावे, शेतकऱ्यांना चोवीस तास वीज, पाणी उपलब्ध व्हावे इत्यादी मागण्यांसाठी किसान सभा या संघटनेकडून विधानभवनावर मोर्चा काढून विधानभवनाला घेराव घातला जाणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी ३० हजारहून अधिक शेतकरी नाशिकहून मुंबईच्या दिशेने चालत आले आहेत. शनिवारी रात्री ठाण्याच्या चेक नाक्यावर मुक्काम केलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी मुंबईत प्रवेश केला. पायी चालणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्व द्रुतगतीमार्गावर ठिकठिकाणी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून पाणी, सरबत, वडापाव, चहाचे वाटप करण्यात आले. विक्रोळी येथे या मोर्चात शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे अंगणवाडी सेविकांनी तसेच आंबेडकर नगरवासियांना मोर्चाचे जंगी स्वागत केले. मोर्चेकऱ्यांनी रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर मोर्चा सोमय्या ग्राऊंडकडे निघाला. सोमय्या ग्राउंडवरून हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.

बळीराजा एकटा नाही - 
नाशिक येथून निघालेला मोर्चा रविवारी सायंकाळी मुंबईच्या घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे पोहचला. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने मोर्चेकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जंगी स्वागत करण्यात आले. बळीराजा आहे म्हणून आम्ही आहोत. बळीराज नसता तर आपली काय गत झाली असती याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे. सरकारकडून बळीराजाची मुस्कटदाबी सुरु आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. बळीराजा एकटा नसून महाराष्ट्रातील जनता आणि कर्मचारी त्यांच्या सोबत आहेत.
- आशा गांगुर्डे, उपसचिव, महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना

Post Bottom Ad