सह्या करून पळून जाणाऱ्या नगरसेवकांचा भत्ता कापणार -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केल्यानंतर आता स्थानिक लोप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली जाणार आहे. महापालिका सभागृह सुरू झाल्यानंतर काही वेळ बसून सभागृहाबाहेर ठेवलेल्या मस्टरवर सही केली की नगरसेवकांना दिवसभराची हजेरी लागून भत्ता लागू होतो. त्यामुळे काही नगरसेवक काही वेळ सभागृहात बसून पळ काढत होते. मात्र आता नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली जाणार आहे. सभागृहात प्रवेश करताना व घरी जाताना हजेरी लावावी लागणार आहे. त्यामुळे सभागृहात उशिरा येणा-या व लवकर जाणा-या नगरसेवकांच्या भत्त्यात कपात केली जाणार आहे. यावर गटनेत्य़ांच्या बैठकीत निर्णय़ झाला असून पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर याची अमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालिका सभागृहात महत्वाच्या विषयांवर चर्चा करून मंजुरी घेतली जाते. विकास कामे व अनेक धोरणात्मक निर्णय़ येथे घेतले जातात. निर्णय़ घेताना नगरसेवकांची उपस्थिती महत्वाची ठरते. सभागृहात अनेक वेळा महत्त्वाचे प्रस्ताव, ठराव मंजूर केले जातात. यासाठी नगरसेवकांची पुरेशी संख्या असणे गरजेचे असते. मात्र अनेक नगरसेवक सभागृहाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. सभागृहाच्या बैठकीस केवळ हजेरीची स्वाक्षरी करण्यापुरते उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना महत्त्वाच्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी व्हिप काढावा लागत आहे. त्यामुळे अशा उशिरा य़ेणा-या व लवकर पळ काढणा-या नगरसेवकांना वेसण लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. ही मागणी गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. बायोमेट्रिक हजेरीमुळे नगरसेवकांना सभागृहात प्रवेश करतेवेळी व जाताना हजेरी बंधनकारक राहणार आहे. तसे न केल्यास अशा नगरसेवकांच्या तासानुसार त्यांच्या त्या दिवसाच्या भत्त्यात कपात केली जाणार आहे. विकास कामांवर आवाज उठवण्यासाठी सभागृह महत्वाचे असते. मात्र काही नगरसेवकांना मस्टरवर हजेरी लावली की दिवस भरत असल्याने कधीही निघता येते. हे प्रमाण वाढल्याने बायोमेट्रिक हजेरी लावण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर बायोमेट्रिक हजेरी नगरसेवकांनाही लागू होणार असल्याने दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार आहे.