पुणे- काेरेगाव भीमा येथे १ जानेवारीला विजय स्तंभाला अभिवादन करण्यास आलेल्या भीम सैनिकांवर दगडफेक करण्यात आली होती. यावेळी उसळलेल्या जातीय दंगलीत चिथावणी दिल्याचा आरोप असलेला समस्त हिंदू अाघाडीचा कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी शिवाजीनगर येथील त्याच्या घरातून बुधवारी दुपारी अटक केली. या दंगलीत सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यात एका तरुणाचा मृत्युही झाला हाेता. बुधवारी सर्वाेच्च न्यायालयाने एकबाेटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच त्याला अटक करण्यात आली.
एकबाेटे याच्यावर खुनाचा प्रयत्न, चिथावणी, दगडफेकीस प्रवृत्त करणे, तेढ निर्माण करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. एकबोटे याने प्रारंभी पुणे कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला हाेता. मात्र, न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत अर्ज फेटाळून लावला हाेता. नंतर उच्च न्यायालयानेही अर्ज फेटाळल्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, एकबोटे याने सर्वाेच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयानेही पोलिस चाैकशीसाठी हजर राहण्याचे अादेश दिले. पोलिसांनी शिक्रापूर पोलिस ठाणे व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत पाच वेळा त्याची चाैकशी केली. मात्र, या चौकशीतही एकबोटे याने प्रतिसाद दिला नसल्याची बाजू पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली होती.