मुंबई । प्रतिनिधी - उघड्या नाल्यांमुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाल्यांवर स्वखर्चाने आच्छादन करण्यासाठी ज्या संस्था पुढे येत आहेत त्यांना पालिका प्रशासनाने तात्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी बुधवारी स्थायी समितीत नगरसेवकांनी लावून धरली . प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस उघड्या नाल्यांमध्ये कचरा तसेच इतर वस्तू टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये घाण वाढून रोगराई निर्माण झाल्याने उघडे नाले बंद करण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र नाले पूर्णपणे बंद केल्यास त्याची पूर्णपणे साफसफाई करणे शक्य नाही .त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार आर -दक्षिण विभागातील कांदिवली येथील पंचोलीया नाला, चारकोप पंपिंग स्टेशन नाला व कांदिवली पूर्व येथील आशानगर नाल्याचे प्रायोगिक तत्त्वावर पॉलिकार्बोरेट शेड बांधून सदर नाला आच्छादित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पालिकेने सुमारे ९७ कोटींचे कंत्राट दिले. यासंदर्भातील प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला असता यावर बोलताना भाजपचे गटनेते मनोज कोटक म्हणाले की, हा पहिला प्रयोग नाही. यापूर्वीही एमएमआरडीएकडून कलागर येथील नालाही आच्छादनाने बंदिस्त करण्यात आला होता. आता पालिकेचा हा पहिला प्रस्ताव आहे. उघड्या नाल्यांमुळे पसरणारी दुर्गंधी तसेच मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन काही धार्मिक संस्था, शाळा, कॉलेज, रुग्णालयीन संस्थानी स्व-खर्चाने आपल्या परिसरातील नाल्यांवर आच्छादन करण्याची तयारी दर्शवली. मात्र यासाठी धोरण नसल्याचे सांगून पालिकेने याला नकार दिला. त्यामुळे यासाठी ज्या संस्था पुढे येत आहेत त्यांना पालिकेने तात्काळ परवानगी द्यावी. तसेच २४ वार्डमध्ये अशी ठिकाणे शोधून तेथेही हा प्रयोग राबवावा अशी जोरदार मागणी सदस्यांनी लावून धरली. मात्र हे छोट्या नाल्यांसाठी केले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळाली.