मुंबई. दि. १६ : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतींसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘आश्रय योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सुमारे २८ हजार सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करून सदनिका उपलब्ध करून देणे नियोजित आहे. सद्यस्थितीत ३९ ठिकाणी असलेल्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करायचे नियोजित असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या धोरणांविषयी लक्षवेधी उपस्थित केली होती. सफाई कामगारांच्या प्रश्नांविषयी शासन गंभीर असून या वसाहतीसंदर्भातील तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करण्यात येईल. सफाई कामगारांना सफाईची कामे करावी लागत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यांचे आयुर्मान कमी होत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाविषयी शासन गंभीर आहे. त्यामुळे त्यांना स्वच्छ वसाहती उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सफाई कामगारांच्या मेडिक्लेमचा हप्ता भरण्यात आला नसल्यास तो तातडीने भरण्यात येईल, असेही डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी भाग घेतला.