मुंबई । प्रतिनिधी - श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होत असून शिवसेनेच्या मातब्बर सदस्यांनी यासाठी जोर लावला आहे. दरम्यान महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेच्या महिला नागरसेविकेकडे जाणार असल्याची माहिती उपलबध झाली आहे. स्थायी समितीतून निवृत्त झालेल्या १२ सदस्यांचे नामनिर्देशनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यात माजी महापौर विशाखा राऊत यांच्या नावाचा समावेश असून त्यांनी स्वतः स्थायी समिती अध्यक्षपद आपल्याला मिळावं अशी मागणी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदी विशाखा राऊत यांची वर्णी लावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीवर २६ नगरसेवकांची वर्णी लावली जाते. समितीचा वर्षभराचा काळावधी असल्याने दरवर्षी एप्रिल महिन्यात नव्या सदस्यांची व अध्यक्षांची निवड केली जाते. २६ पैकी १३ सदस्यांना चिठ्ठयांद्वारे निवृत्त करण्याचा नियम आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीत निवृत्त आणि राहिलेल्या सदस्यांसाठी चिट्ठ्या काढण्यात आल्या. भाजपचे गटनेते मनोज कोटक, काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, अखिल भारतीय सेनेच्या गिता गवळी, भाजपचे मकरंद नार्वेकर, सुनिता यादव, पराग शाह, राजश्री शिरवडकर, अभिजित सामंत, विद्यार्थी सिंग तर सत्ताधारी शिवसेनेचे राजुल पटेल, सुजाता सानप व मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप लांडे हे निवृत्त झाले होते. या निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागी नव्याने निवड केली जाणार आहे. नव्या सदस्यांमध्ये शिवसेनेकडून विशाखा राऊत आणि भाजपकडून कमलेश यादव यांची नावे आली आहेत. याबाबतचा प्रस्ताव समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे. विशाखा राऊत यांची अध्यक्षपदी निवड केली जाणार असल्याने त्यांना समितीत स्थान देण्यात आल्याचे समजते.
अध्यक्षपदी कोण याची चर्चा -
मागील वर्षी स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी आशिष चेंबूरकर आणि मंगेश सातमकर यांची नावे आघाडीवर होती. परंतु, शिवसेनेच्या वरिष्ठांकडून रमेश कोरगांवकर यांच्या नावाची शिफारस केली. यामुळे दोघेही दुखावले गेले होते. त्यामुळे दोघांना यावेळी संधी मिळेल अशी शक्यता होती. मात्र त्यापूर्वीच दोघांना बाजूला करण्यात आल्याने नव्या अध्यक्षपदी कोण अशी चर्चा होती. परंतु, शिवसेनेने विशाखा राऊत यांना समितीत संधी दिल्याने अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
स्थायीमध्ये यांची नियुक्ती -
स्थायीमध्ये यांची नियुक्ती -
राष्ट्रवादीकडून गटनेत्या राखी जाधव, अखिल भारतीय सेनेकडून गिता गवळी, भाजपकडून मनोज कोटक, मकरंद नार्वेकर, कमलेश यादव, पराग शाह, राजश्री शिरवडकर, अभिजित सामंत, विद्यार्थी सिंग तर सत्ताधारी शिवसेनेकडून राजुल पटेल, सुजाता सानप आणि विशाखा राऊत