महिलेच्या पोटातून पावणे तीन किलोची गाठ काढली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 April 2018

महिलेच्या पोटातून पावणे तीन किलोची गाठ काढली


36 वर्षीय महिलेवर कूपर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया - 
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या जुहू विलेपार्ले येथील "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नर्सी कूपर सर्वसाधारण रुग्णालयात" एका 36 वर्षीय महिलेच्या गर्भपिशवित आढळून आलेली मोठी गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांच्या नेतृत्वात तज्ञ् डॉक्टरांच्या चमुने केलेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान तब्बल 2.75 किलो वजनाची गाठ सदर महिला रुग्णाच्या पोटातून काढण्यात आली आहे. या रुग्णाची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या कूपर रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात एक महिला पोटदुखी व रक्तस्रावाची आरोग्य विषयक तक्रार घेऊन उपचारासाठी आली होती. दोन मुलांची आई असलेल्या व आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातील असलेल्या या महिलेचे पोट साधारणपणे 7महिन्यांच्या गरोदर महिलेप्रमाणे दिसत होते. या महिलेची अधिक तपासणी व आवश्यक त्या अत्याधुनिक चाचण्या केल्या असता, महिलेच्या गर्भपिशवीत मोठी गाठ आढळून आली. ही गाठ वाढती असल्याने तसेच या गाठीचा रुग्णाच्या जिविताला असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, त्यावेळी महिलेच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण केवळ 4 होते. तसेच सातत्याने रक्तस्राव देखील चालू होता. ज्यामुळे शस्त्रक्रिया करणे धोक्याचे होऊ शकले असते. ही बाब लक्षात घेऊन शस्त्रक्रियेपूर्वी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी व रक्तस्राव थांबविण्यासाठी औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात वाढल्यावर आणि रक्तस्राव थांबल्यानंतर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही गाठ अतिशय मोठी असल्याने व ही गाठ काढताना होऊ शकणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचा वर्षांचा अनुभव असणा-या अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी स्वत:च सदर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉ. गणेश शिंदे, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. हेमलता कुहिते, डॉ. हेमा रेलवानी, डॉ. नेही पारिख या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सलग दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण महिलेच्या पोटातून पावणे तीन किलो वजनाची मोठी गाठ काढली आहे. या शस्त्रक्रियेनंतर सदर महिलेची प्रकृती आता उत्तम असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गर्भाशयातील गाठीची लक्षणे - 
गर्भाशयात गाठ असणा-या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होणे, मोठ्या प्रमाणात रक्तस्रावाचा त्रास होणे, लैंगिक संबंधांदरम्यान त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. या प्रकारची लक्षणे आढळून आल्यास महिलांनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा व दुखणे अंगावर काढू नये. 
- डॉ. गणेश शिंदे, अधिष्ठाता

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad