मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या प्रमोद दिनकर भोसले या सहायक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. बिलाची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी आरोपीने ५० हजारांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम घेताना गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील ४६ वर्षीय तक्रारदाराने मुंबई महानगर पालिकेला १ कोटी ८० लाख ३० हजार रुपयांच्या वॉटर प्युरीफायरचा पुरवठा केला होता. यासंदर्भातील बिल पास करण्यासाठी भायखळा येथील देखभाल आणि अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक अभियंता प्रमोद भोसले याने फिर्यादीकडे लाच मागितली होती. बिलाच्या एकूण रकमेच्या तीन टक्के रक्कम लाच म्हणून देण्याची मागणी आरोपी भोसले याने फिर्यादीकडे केली होती. दरम्यान, याविषयी फिर्यादीने लाचलुचपत विभागात तक्रार केल्यानंतर आरोपी प्रमोद भोसले याला सापळा रचून ५० हजारांची लाच घेताना गुरुवारी अटक करण्यात आली. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment