पालिका मुख्यालयातील बायोमेट्रिक मशीन पडल्या बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 April 2018

पालिका मुख्यालयातील बायोमेट्रिक मशीन पडल्या बंद

हजेरीसाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा -
मुंबई - मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली. त्यासाठी पालिकेच्या मुख्यालयापासून सर्व कार्यालयात बायोमेट्रीक मशीन लावण्यात आल्या. लावण्यात आलेल्या या मशिनपैकी मुंबई महापालिका मुख्यालयातील बहुतेक मशीन बंद पडल्या असल्याने हजेरी लावण्यासाठी आणि कामावरून सुटल्याची नोंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्धाहून अधिक तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना होणार त्रास लक्षात घेऊन पालिकेने या मशीन त्वरित दुरुस्त कराव्यात अन्यथा त्याविरोधात आंदोलन व संप करावा लागेल असा इशारा म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने दिला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदविण्यासाठी पालिकेने मस्टरवरील हजेरी बंद करुन कार्ड पंचीग मशीनद्वारे हजेरी घेण्यास सुरुवात केली. मात्र, या यंत्रणेचा दुरुपयोग होऊ लागला. त्यामुळे पचिंग मशीन योजना बंद करून त्याऐवजी बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरीची योजना पालिकेने चार वर्षांपूर्वी सुरू केली. बायोमेट्रिकमुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली. मात्र, पालिकेच्या अनास्थेमुळे काहीच दिवसांत या मशिन बंद पडल्या आणि पुन्हा मस्टरवर हजेरी सुरू झाली. त्यामुळे लेट लतिफांची संख्या पुन्हा वाढली. प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यावर पालिकेने यात बदल करुन नव्याने बायोमेट्रीक मशीन लावल्या. सर्व विभागात चार हजाराहून अधिक मशिन उपलब्ध करण्यात आल्या. मशीनला आधार कार्ड जोडण्यात आले. त्यामुळे उशीरा हजेरी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांची अर्धा दिवासाची हजेरी नोंद होऊ लागली. सामान्य प्रशासन विभागाने ३१ ऑक्टोबरला परिपत्रक जारी करून बायोमेट्रिक प्रणालीतील उपस्थितीनुसारच मासिक वेतनाची आकारणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सर्व प्रकारच्या रजा, बाहेरील कामे, उशिरा येणे, पगार थांबवणे आदी सर्व बाबींचा समावेश यात केला. त्यानुसार ४० हजार कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यांचे वेतन कापण्यात आले. मात्र, काहीच महिन्यात मुख्यालयातील बायोमेट्रीक मशीन बंद पडल्या आहेत. चिटणीस विभागातील सहा मशीन नादुरुस्त आहेत. तर इतर विभागातील मशीनची तीच स्थिती आहे. केवळ अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातील एकमेव मशीन सुरु अाहे. त्यामुळे हजेरी नोंदविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सकाळ, संध्याकाळ येथे गर्दी होत आहे. सुमारे अर्धाहून अधिकतास कर्मचाऱ्यांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. एकीकडे हजेरीची सक्ती करायची व दुसरीकडे मशीनकडे दुर्लक्ष करायचा अशी भूमिका प्रशासन बजावत असल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, २५ कर्मचाऱ्यांमागे एक मशीन लावण्याची मागणी कामगार संघटनांनी केली होती. परंतु, प्रशासनाने ४० हून अधिक कर्मचाऱ्यांकरिता एक मशीन लावण्यात आली आहे. या अनेकदा मशीन बंद असतात. त्यामुळे कामगारांचा गोंधळ उडतो. त्यात सदोष नेटवर्कमुळे कामगारांची विनाकारण अनुपस्थिती लागते. शिवाय, दुरवरून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जातो. प्रशासनाने मशीनच्या वाढत्या समस्यांची दखल घेवून तात्काळ सुधारणा कराव्यात. अन्यथा मशीनविरोधात संप केला जाईल, असा इशारा म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad