मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १७ प्रभाग समित्यांपैकी ८ प्रभाग समित्यांची निवडणूक गुरुवारी संपन्न झाल्या. त्यात भाजपाने ५ समित्यांचे अध्यक्षपद मिळविले होते. आज संपन्न झालेल्या ८ प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. यात शिवसेनेला ४ आणि भाजपाला ४ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळाले. एकूण १७ पैकी १६ प्रभाग समित्यांच्या निवडणूका संपन्न झाल्या असून त्यापैकी भाजपाला ९ तर शिवसेनेनला ७ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळाले आहे. भाजपाला मिळालेल्या प्रभाग समित्यांमध्ये एक प्रभाग समितीवर अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांची निवड झाली आहे.
आज झालेल्या निवडणुकीत ‘जी/उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या मरिअम्माल मुथुरामलिंगाम थेवर, ‘एच/पूर्व आणि एच/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे सदानंद परब, ‘के/पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे सुनिल यादव, ‘के/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे योगीराज दाभाडकर, ‘एल’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक किरण ज्योतीराम लांडगे, ‘एम/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे राजेश ओमप्रकाश फुलवारीया, ‘एन’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या रुपाली सुरेश आवळे, ‘एस’ आणि ‘टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या सारिका मंगेश पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ‘जी/उत्तर’ प्रभाग, ‘एच/पूर्व’ आणि ‘एच/पश्चिम प्रभाग, ‘के/पूर्व’ प्रभाग, ‘के/पश्चिम’प्रभाग या ४ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कामकाज सांभाळले, तर ‘एल’ प्रभाग, ‘एम/पश्चिम’ प्रभाग, ‘एन’ प्रभाग, ‘एस’ आणि ‘टी’ या ४ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर हेमांगी वरळीकर यांनी कामकाज पाहिले. उर्वरित ‘एम/पूर्व’ प्रभाग समितीची निवडणूक शुक्रवार, दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार असून पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर हेमांगी वरळीकर या उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment