महापालिकेचा विकास कामांवर ८२.६८ टक्के खर्च केल्याचा दावा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेचा विकास कामांवर ८२.६८ टक्के खर्च केल्याचा दावा

Share This

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतूद करण्यात आलेला निधी खर्च होत नाही अशी सतत बोंब असताना भांडवली खर्चाच्या विनियोगात ३१ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. २०१७-१८ च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार भांडवली खर्चासाठीच्या ६ हजार १११ कोटींच्या तरतुदींपैकी ५ हजार ५२ कोटी म्हणजेच ८२.६८ टक्के एवढी रक्कम विविध विकास कामांवर खर्च झाली आहे. मागील दहावर्षातील हा उच्चांक असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

मुंबईकरांना सोयी सुविधा पुरविण्याचे काम पालिका करते. अर्थसंकल्पात त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. रस्ते, पर्जन्यजल वाहिन्या, पाणी पुरवठा व मलनि:सारण, विकास नियोजन,सार्वजनिक आरोग्य, प्रमुख रुग्णालये, उद्याने, मंडई यासारख्या लोकापयोगी कामांचा समावेश असतो. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या सुधारित अंदाजापत्रकातील रुपये ९९९.७० कोटींच्या तरतुदीं केली होती. यापैकी ९८२.४३ कोटी रक्कम म्हणजेच तब्बल ९८.२७ टक्के खर्च झाली आहे. 'जी बजेट' मधील पाणी पुरवठा, पाणी पुरवठा प्रकल्प, मलनि:सारण प्रचालने व प्रकल्प, मुंबई मलनि:सारण प्रकल्प या खात्यांशी संबंधित कामांचा समावेश आहे. जल अभियंता खात्याकरिता ४८०.६३ कोटींच्या भांडवली तरतुद केली होती. यापैकी ४५९.९९ कोटी म्हणजेच ९५.७१ टक्के रकमेचा विनियोग झाला. गेल्या वर्षी ९१.८२ टक्के रक्कम खर्च झाली होती. मलनि:सारण प्रचालने खात्याच्या ८४.९५ कोटी रुपयांच्या भांडवली तरतुदींपैकी ९२.५७ टक्के म्हणजे ७८.६४ कोटींचा विनियोग झाला. रस्ते व वाहतूक खात्यासाठी ११७८ कोटींपैकी ९१.३३ टक्के विनियोग झाला. प्रमुख रुग्णालये खात्यासाठीच्या २०२.१३ कोटींच्या तरतुदींपैकी ९०.८३ टक्के म्हणजेच १८३.६० कोटींचा विनियोग करण्यात आला. पर्जन्य जलवाहिन्या खात्यासाठीच्या ६२८.७३ कोटींच्या तरतुदींपैकी ९५.१२ टक्के रक्कमेचा विनियोग झाला. मागील वर्षी याचवर ८९.२२ टक्के रक्कम खर्च झाली होती. तर प्राथमिक शिक्षणासाठी २७४.४२ कोटींच्या तरतुदींपैकी ८७.४९ टक्के रक्कम खर्च झाली. गेल्या वर्षी ७८.४३ टक्के रक्कम खर्च झाली होती. मागील आर्थिक वर्षात महापालिकेने आपल्या अनेक सुविधा ऑनलाईनपद्धतीने देण्यास सुरुवात केली. यासाठी १३२.५६ कोटी तरतुदींपैकी ७९.२७ टक्के विनियोग करण्यात आला आहे. मागील वर्षी यावर ५८.४८ टक्के खर्च झाला होता, असा दावा पालिकेने केला आहे.

सुधारित अंदाजपत्रकातील भांडवली खर्च(कोटीत) 
आर्थिक वर्ष      तरतूद          विनियोग      टक्केवारी
२०१७-१८       ६,१११.०७        ५०५२.७९        ८२.६८ 
२०१६-१७       ५,३९९.६७        ३,८५०.४६       ७१.३१

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages