मुंबई - मुंबईत पावसाळ्यादरम्यान इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. या दुर्घटनांमध्ये जीवित आणि वित्त हानी होत असते. पावसाळयात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण महापालिकेकडून सुरू असून 15 मेपर्यंत धोकादायक इमारतींची यादी जाहिर केली जाणार आहे. या यादीमधील अतिधोकादायक असलेल्या इमारतीमधील रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी इमारती खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या जाणार आहेत.
पालिका दरवर्षी पावसापूर्वी मुंबईतील जुन्या इमारतींचा सर्व्हे करून धोकादायक इमारतींची यादी जाहिर करते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत तब्बल सुमारे 508 धोकादायक इमारती असून यामध्ये राहणार्या हजारो रहिवाशांवर धोक्याची टांगती तलवार आहे. पालिकेकडून नोटिसा बजावून इमारत रिकाम्या करण्यासाठी सूचना केल्या जातात. मात्र पुनर्विकासाचे ठोस आश्वासन मिळत नसल्याने अनेक रहिवासी इमारत सोडण्यास नकार देतात. अनेकांना माहुलला स्थलांतरीत केले आहे. मात्र तेथील स्थिती दयनीय असल्याने रहिवासी जाण्यास स्पष्टपणे नकार देतात. पावसाळा सुरू होण्याआधी प्रशासन महापालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. पालिकेकडून अशा अतिधोकादायक इमारतींचा विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. तसेच पाणी जोडणीही तोडली जाते. मात्र तरीही काही ठिकाणी रहिवाशी धोकायदायक जागा रिकामी करण्यास टाळाटाळ करतात अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकार्याने दिली. मागील वर्षीच्या 102 इमारती अतीधोकादायक आहेत. पावसापूर्वी या इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महापालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर सी-1, सी -2 आणि सी-3 अशी कॅटेगरी केली जाते. सी-1 मध्ये आलेल्या इमारती अतिधोकादायक मानल्या जातात. सी-2 यादीत असलेल्या इमारतींच्या स्ट्रक्चरला रिपेअरची गरज असते, तर सी-3 इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते. मुंबई महापालिका कायदा 1888 अंतर्गत पालिकेकडून नोटीस बजावली जाते. सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले जातात.
No comments:
Post a Comment