मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून जलनिस्सारण वाहिनेचे काम करणाऱ्या कामगारांवर अन्याय केला जात आहे. त्यांना सोयी सुविधा, किमान वेतन दिले जात नाहीत. तसेच कंत्राटदाराकडून खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कामगार दिनी (१ मे) हे कामगार सामुदायिक मुंडन आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे चिटणीस विजय दळवी यांनी दिली.
मुंबई महापालिकेद्वारे पर्जन्य जलनिस्सारण विभागाकडून लहान व मोठी गटारे मॅनहोल साफ केली जातात. फायरेक्स व सक्शन कम जेटिंग मशीनद्वारे गटारे, मॅनहोल साफ करण्याचे काम गेले कित्तेक वर्षे ६० कर्मचारी करत आहेत. मुंबईत पावसाळ्यादरम्यान पाणी साचू नये म्हणून आपले आयुष्य व आरोग्य धोक्यात घालून हे कर्मचारी काम करत असतात. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने, गमबुट, हातमोजे, सेफ्टी हेल्मेट, पुरविणे बंधनकारक असताना अद्याप देण्यात आलेली नाहीत. या कर्मचाऱ्यांच्या पगारातून गेले कित्येकवर्षे पीएफ व कामगार विम्याची रक्कम कापली जात आहे. मात्र त्याच्या पावत्या व कार्ड अद्यापही देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या कामगारांना सुट्टी दिल्या जात नाहीत तीन पाळ्यांमध्ये त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. कंत्राटदार या कामगारांना सणासुदीच्या दिवसातही राबवून घेत असतात. या कामगारांना १४ हजार ७०० रुपये इतके वेतन द्यावे असा नियम असताना फाजल ८ हजार रुपये पगार दिला जात आहे. इतर रक्कम कंत्राटदार व पालिका अधिकारी हडप करत असल्याने कामगारांनी युनियन स्थापन केली आहे. युनियन स्थापन केली म्हणून जुन्या कामगारांना काम नाकारून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. यामुळे दादर येथील उप प्रमुख अभियंता पर्जन्य जलवाहिन्या यांच्या कार्यालयात मुंडन आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती दळवी त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment