मुंबई - मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात सुरक्षा रक्षकांनी एका तोतया पोलिसाला पकडले आहे. सुरक्षा रक्षकांनी या तोतया पोलिसाला पकडून स्थानीक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रुग्णालयातील सुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेचे सायन येथे लोकमान्य टिळक रुग्णालय आहे. हे रुग्णालय शिव आणि सायन या नावाने प्रसिद्ध आहे. काही महिन्यापूर्वी या रुग्णालयातील एका डॉक्टरला मारहाण झाल्याने डॉक्टरांनी संप केला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडे पास असल्याशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. याच दरम्यान एक व्यक्ती आपले नाव विश्वनाथ राणे असून आपण पोलीस असल्याचे सांगून रुग्णालय परिसरात गेले सात आठ दिवस वावरत होता. सुरक्षा रक्षकांना त्याच्या हालचालीवर संशय निर्माण झाल्याने त्याची माहिती सुरक्षा अधिकारी सागर नाईक व रवींद्र पाटील यांना देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या आदेशाने या व्यक्तीच्या हालचालीवर काही दिवस सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जात होते. वरिष्ठांच्या आदेशाने सुरक्षा रक्षक चंद्रकांत कदम, लहू चव्हाण, शिवाजी शिरसाठ, महेंद्र मोरे, नितीन भिल्ला यांनी या व्यक्तीला पकडले. सुरक्षा कार्यालयात त्याच्याकडील कागदपत्रांची चौकशी केल्यावर त्याचे नाव विश्वनाथ राणे नसून इरफान शेख असे असल्याचे समोर आले. त्याच्या बुटामध्ये लपवलेले पोलिसाचे ओळखपत्रही सुरक्षा रक्षकांना भेटले आहे. सदर व्यक्ती तोतया पोलीस असल्याचे उघडकीस आल्याने त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. इरफान शेख याच्या विरोधात १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जगदाळे अधिक तपास करीत असल्याची माहिती माहिती सुरक्षा दलाचे उपप्रमुख अधिकारी अभय चौबळ यांनी दिली.
No comments:
Post a Comment