नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तिकीट दरांबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न म्हणून सरकारच्या वतीने शुक्रवारी प्रथमच या द्रुतगती रेल्वेगाडीचे अंदाजे तिकीट दर सांगण्यात आले. या मार्गावरील प्रवासाच्या अंतरानुसार हे दर कमीत कमी २५० ते शेवटच्या स्थानकापर्यंत ३००० रुपये असतील, अशी माहिती बुलेट ट्रेन प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाच्या (एनएचएसआरसीएल) वतीने देण्यात आली.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी शुक्रवारी यासंबंधी पत्रकारांना माहिती दिली. 'वांद्रे ते ठाणे असा टॅक्सीने प्रवास केल्यास सुमारे १ ते दीड तास लागतो. त्यासाठी टॅक्सीचे भाडे साधारणत: ६५० रुपये एवढे होईल. तेच अंतर बुलेट ट्रेन अवघ्या २० मिनिटांत पार करेल व त्यासाठीचे तिकीट सुमारे २५० रुपये असेल. वांद्रे ते अहमदाबाद या पूर्ण प्रवासासाठी तिकीट दर ३००० रुपये असेल,' असे खरे यांनी सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी, प्रकल्पावर होणारा अपेक्षित खर्च आणि प्रत्यक्ष रेल्वेचे परिचलन करण्यासाठी येणारा खर्च याची सांगड घालून तिकीट दरांचा हा अंदाज मांडण्यात आला आहे, असेही खरे यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment