मुंबई । प्रतिनिधी - महापालिका हद्दीतील उपहारगृहांना स्मोकिंग झोन परवाने देताना शुल्क आकारण्यात यावे, अशी ठरावाची सूचना भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मांडली आहे. असे शुल्क आकारल्याने महापालिकेच्या महसूलात भर पडेल, असा दावा नार्वेकर यांनी केला आहे.
उपहारगृहांमध्ये स्मोकिंग झोनसाठी स्वतंत्र बंदिस्त जागा ठेवावी, असे सर्वाेच्य न्यायालयाचे निर्देश आहेत. या निर्देशानुसार उपहारगृहांमध्ये स्मोकिंग झोन तयार करताना ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईतील उपहारगृहांना आरोग्य, अनुज्ञापन आणि दुकाने व आस्थापना खात्यांकडून विविध प्रकारची परवाने दिली जातात. ही परवाने देताना विहीत शुल्क आकारण्यात येते. यापूर्वी विनाशुल्क परवाने दिली जात होती. मात्र, आता हे प्रमाणपत्र देताना शुल्क आकारण्यात यावे, जेणेकरुन या शुल्कामुळे पालिका महसूलात भर पडेल अशी सूचना भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सभागृहाच्या पटलावर मांडली आहे. येत्या सभागृहात ही सूचना मंजूर होण्याची शक्यता आहे.